Jasprit Bumrah Creates History in International Cricket: भारतीय संघाचा तिन्ही फॉरमॅटमधील नंबर वन गोलंदाज जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम केला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेला सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात जसप्रीत बुमराहने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. बुमराहला सुरूवातीच्या स्पेलमध्ये विकेट मिळाली नाही, पण दुसऱ्या स्पेलमध्ये मात्र बुमराहने भेदक गोलंदाजी करत दोन विकेट्स मिळवल्या आणि अनोखा विक्रम आपल्या नावे केला.
जसप्रीत बुमराहच्या २ विकेट्स सह भारताच्या सर्व गोलंदाजांनी पहिल्या टी-२० सामन्यात आक्रमक गोलंदाजी करत १०१ धावांनी सामना जिंकला. भारताने प्रथम फलंदाजी करताना हार्दिक पंड्याच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर १७५ धावांचा पल्ला गाठला. खराब सुरूवातीनंतरही भारताने चांगली धावसंख्या उभारली. तर दक्षिण आफ्रिकेचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही आणि परिणामी संघ ७४ धावांवर सर्वबाद झाला.
जसप्रीत बुमराह सुरूवातीच्या षटकांमध्ये विकेट मिळाली नाही. पण ११ व्या षटकात बुमराह गोलंदाजीला आला आणि त्याने एकाच षटकात दोन विकेट्स घेतल्या. बुमराहने येताच दुसऱ्या चेंडूवर डेवाल्ड ब्रेविसला झेलबाद करत १०० विकेट्स घेतल्या. यानंतर बुमराहने पाचव्या चेंडूवर केशव महाराजला बाद करत दुसरी विकेट मिळवली.
जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० विकेट्स घेणारा भारताचा पहिला गोलंदाज ठरला आहे. बुमराहने डेवाल्ड ब्रेविसला बाद करत टी-२० क्रिकेटमधील १००वी विकेट मिळवली. बुमराहने कसोटीत २३४ विकेट्स, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४९ तर टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत १०१ विकेट्स घेतल्या आहेत.
जसप्रीत बुमराह आंतराराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० विकेट्स घेणारा जगातील पाचवा गोलंदाज ठरला. जसप्रीत बुमराहच्या आधी लसिथ मलिंगा, टीम साऊदी, शाहीन शाह आफ्रिदी व शाकिब अल हसन यांनी अशी कामगिरी केली आहे. पण जसप्रीत बुमराहने मात्र १०० विकेट्स तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० विकेट्स घेणारा भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला.
तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० विकेट्स घेणारे गोलंदाज
टीम साऊदी – कसोटी-३९१ विकेट्स, वनडे-२२१ विकेट्स, १६४-टी-२०
शाकिब अल हसन – कसोटी-२४६ विकेट्स, वनडे-३१७ विकेट्स, १४९-टी-२०
शाहीन आफ्रिदी – कसोटी-११६ विकेट्स, वनडे-१३१ विकेट्स, ११८-टी-२०
लसिथ मलिंगा – कसोटी-१०१ विकेट्स, वनडे-३३८ विकेट्स, १०७-टी-२०
जसप्रीत बुमराह – कसोटी-२३४ विकेट्स, वनडे-१४९विकेट्स, १०१-टी-२०
