Jasprit Bumrah Bowled Quinton de cock video: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० विश्वचषक २०२६ मधील सुपर-८ टप्प्यातील पहिला सामना खेळवला जात आहे. टी-२० विश्वचषकातील हा अटीतटीचा सामना होणार आहे, त्यामुळे या सामन्यावर सर्वांच्या नजरा आहेत. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करत असलेल्या टीम इंडियाला जसप्रीत बुमराहने उत्कृष्ट सुरूवात करून दिली. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकला बुमराहने कमालीच्या चेंडूवर झेलबाद केलं आहे. ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दक्षिण आफ्रिकेने सुपर-८ सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यासह टीम इंडिया अहमदाबादच्या मैदानावर प्रथम गोलंदाजी करत आहे. टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही. गेल्या सामन्याप्रमाणे उपकर्णधार अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदर या सामन्यात खेळताना दिसणार आहे. हा चकित करणारा निर्णय घेण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेचे दोन्ही सलामीवीर फॉर्मात होते. एडन मारक्रम व क्विंटन डी-कॉकने अर्शदीपच्या पहिल्या षटकात सावध सुरूवात करत ४ धावा केल्या. यानंतर दुसरं षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह आला. जस्सीच्या षटकातील चौथ्या चेंडूवर क्विंटन डी-कॉकने चौकार मारला. तर पाचव्या चेंडूवर बुमराहने त्याला क्लीन बोल्ड करत लगेच बदला घेतला आणि संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला.

जसप्रीत बुमराहचा चेंडू टप्पा पडून आतल्या बाजूला वळला आणि डी-कॉक तो चेंडू खेळायला चुकला. डी-कॉक खेळायला चुकताच जस्सीचा १३७ किमी प्रतितास वेगाचा चेंडू थेट विकेटवर जाऊन आदळला आणि क्लीन बोल्ड होत माघारी परतला. बोल्ड झाल्यानंतर डी कॉक देखील चकित झाला आणि त्याने मागे वळून विकेटकडे पाहत तंबूत परतला.

जसप्रीत बुमराहनंतर पुढच्या तिसऱ्या षटकात मारक्रमला झेलबाद करत दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का दिला. त्यानंतर स्पेलमधील दुसऱ्याच षटकात बुमराहने रायन रिकल्टनला झेलबाद करत भारताला अजून एक विकेट मिळवून दिली. बुमराहने दोन षटकांत दोन विकेट्स मिळवून दिल्या. ज्यामुळे पॉवरप्लेमध्ये भारताने चांगली सुरूवात केली. यासह पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेने ३ विकेट्स गमावत ४१ धावा केल्या आहेत. डेव्हिड मिलर व डेवाल्ड ब्रेविस ही जोडी दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरताना दिसत आहे.