Jasprit Bumrah 150 wickets in ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर, इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने भारतीय गोलंदाजांविरुद्ध आक्रमक सुरुवात करत ६१ धावांची शानदार भागीदारी केली. मात्र, १३ व्या षटकात गुरनूर ब्रारने दोन्ही सलामीवीरांना बाद करत टीम इंडियाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहने कर्णधार हॅरी ब्रूकची विकेट घेत भारताला मोठी विकेट मिळवून दिली. यासह बुमराहने मोठा विक्रम आपल्या नावे केला.
भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने ९६८ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केलं. पुनरागमनाच्या सामन्यात बुमराहने कमाल गोलंदाजी केली. आपल्या पहिल्या चार षटकांत जसप्रीतने केवळ ८ धावा दिल्या. यानंतर स्पेलमधील पाचव्या षटकात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकची विकेट घेत त्याने दोन महत्त्वाचे टप्पे गाठले. या विकेटसह त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५० बळींचा टप्पा पूर्ण केला. तसेच, इंग्लंडमध्ये सर्वाधिक एकदिवसीय बळी घेणारा भारतीय गोलंदाज होण्याचा मानही त्याने मिळवला.
बुमराहने एका उत्कृष्ट चेंडूवर हॅरी ब्रूकला बाद केलं. बुमराहचा ‘बॅक-ऑफ-लेंथ’ टप्प्यावर पडलेला आणि उसळी घेणारा चेंडू टप्प्यानंतर सरळ रेषेत गेला. ब्रूकने बॅटचे तोंड उघडलं आणि फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूच्या अतिरिक्त उसळीमुळे तो बॅटच्या कडेला लागला आणि चेंडू थेट स्लिपमध्ये उभा असलेल्या रोहित शर्माच्या हातात गेला.
हॅरी ब्रूक हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये बुमराहचा १५०वा बळी ठरला. यासह, सर्वात कमी चेंडूंमध्ये १५० एकदिवसीय बळींचा टप्पा गाठणारा बुमराह हा तिसरा भारतीय गोलंदाज बनला; त्याने ही कामगिरी ४,६०५ चेंडूंमध्ये पूर्ण केली. सर्वात कमी चेंडूंमध्ये १५० एकदिवसीय बळी घेण्याचा भारतीय विक्रम मोहम्मद शमीच्या नावावर आहे, ज्याने ही कामगिरी ४,०७० चेंडूंमध्ये केली होती.
सर्वात कमी चेंडूंमध्ये एकदिवसीय सामन्यांत १५० बळींचा टप्पा गाठणारे भारतीय गोलंदाज
४०७० – मोहम्मद शमी
४५१३ – कुलदीप यादव<br>४६०५ – जसप्रीत बुमराह</p>
हॅरी ब्रूकला बाद करून, बुमराह इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक एकदिवसीय (ODI) बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. त्याने रवींद्र जडेजाचा विक्रम मोडला; जडेजाने इंग्लंडमध्ये ३० बळी घेतले होते, तर बुमराहच्या नावावर आता ३१ एकदिवसीय बळींची नोंद झाली आहे.
इंग्लंडमध्ये भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय (ODI) बळी घेणारे गोलंदाज
३१ – जसप्रीत बुमराह
३० – रवींद्र जडेजा
२८ – भुवनेश्वर कुमार</p>
