Jasprit Bumrah Most Maiden Overs Record: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून एकतर्फी विजयाची नोंद केली होती. तर दुसरा सामना देखील दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

जसप्रीत बुमराह गेल्या काही टी-२० मालिकांमध्ये खेळू शकला नव्हता. दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतही खेळण्यावर प्रश्नचिन्ह होतं. पण त्याने फिटनेस सिद्ध केली आणि दमदार पुनरागमन केलं. या सामन्यात जसप्रीत बुमराहने ४ षटकांत २६ धावा खर्च करून १ गडी बाद केला होता. आता दुसऱ्या टी-२० सामन्यातील पहिले षटक त्याने निर्धाव टाकले. अफगाणिस्तानकडून इब्राहिम जादरान स्ट्राईकवर होता. बुमराहने त्याला या षटकात एकही धाव करू दिली नाही.

यासह गोलंदाजीच्या बळावर त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. जसप्रीत बुमराह हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव षटकं टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध टाकलेलं हे निर्धाव षटक त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १३ वे निर्धाव षटक आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या झिम्बाब्वेच्या रिचर्ड नगारावाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२ निर्धाव षटकं टाकली होती. आतापर्यंत बुमराह आणि रिचर्ड नगारावा हे दोघेही या यादीत अव्वल स्थानी होते. आता रिचर्डला मागे टाकत बुमराह अव्वल स्थानी पोहोचला आहे. तसेच भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. भुवनेश्वर कुमारने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० निर्धाव षटकं टाकली आहेत.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११:

भारत (प्लेइंग ११): संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, रवि बिश्नोई

अफगाणिस्तान (प्लेइंग ११): रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान (कर्णधार), सेदिकुल्लाह अटल, गुलबदिन नायब, दरविश रसुली, अझमतुल्लाह ओमरझाई, मोहम्मद नबी, राशिद खान, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी