Turning Point Of MI vs PBKS Match: पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२६ स्पर्धेत सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात विजय मिळवल्यानंतर पुढील चारही सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबईने पंजाबसमोर विजयासाठी १९६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने दमदार विजयाची नोंद केली आहे. दरम्यान काय होता या सामन्यातील टर्निंग पॉईंट? जाणून घ्या.

या सामन्यात मुंबईचा संघ आणखी मोठी धावसंख्या उभारु शकला असता. पण नमन धीरला वगळता इतर कुठल्याही फलंदाजाकडून क्विंटन डी कॉकला हवी तशी साथ मिळाली नाही. त्यामुळे २२० ची स्वप्न पाहणारा मुंबईचा डाव १९५ धावांवर थांबला. फलंदाजीत फ्लॉप राहिल्यानंतर मुंबईचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकही हवं तसं योगदान देऊ शकले नाहीत. गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करू शकले नाहीत. पण जेव्हा संधी मिळाली, त्या हातच्या संधी त्यांनी गमावल्या. यादरम्यान जसप्रीत बुमराहने सोडलेला झेल मुंबईला चांगलाच महागात पडला.

बुमराहची ही चूक मुंबईला चांगलीच महागात पडली

तर झाले असे की, पंजाबकडून डावाची सुरूवात करण्यासाठी प्रियांश आर्य आणि प्रभसिमरनची जोडी मैदानावर आली. पण प्रियांश आर्य स्वस्तात माघारी परतला. या डावात ८० धावांची खेळी करणारा प्रभसिमरन सिंग देखील स्वस्तात बाद झाला असता, पण बुमराहने हातचा झेल सोडला. चौथे षटक टाकण्यासाठी हार्दिक पंड्या गोलंदाजीला आला. त्यावेळी प्रभसिमरन अवघ्या ११ धावांवर फलंदाजी करत होता. हार्दिकने ऑफ साईडच्या दिशेने संथ चेंडू टाकला. प्रभसिमरनने कट शॉट मारला. पण चेंडू बॅटची कडा घेऊन बुमराहच्या दिशेने गेला. चेंडू बुमराहच्या दोन्ही हातात विसावला होता, पण थोडक्यात हा झेल सुटला. त्यानंतर मग त्याने मागे वळून पाहिलं नाही. त्याने नाबाद ८० धावांची खेळी केली आणि पंजाबला ७ गडी राखून विजय मिळवून दिला.

या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सकडून नमन धीरने ५० धावांची खेळी केली. तर क्विंटन डी कॉकने नाबाद ११२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने २० षटकांअखेर १९५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जकडून प्रियांश आर्य १५ धावा करून माघारी परतला. तर कुपर कॉनोलीने १७ धावांची खेळी केली. तर प्रभसिमरन सिंगने नाबाद ८० धावांची खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने ६६ धावांची खेळी केली. पंजाबने हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला.