Jasprit Bumrah Explains Turning Point of India Win: भारताने वेस्ट इंडिजवर ५ विकेट्स आणि ४ चेंडू राखून विजय मिळवत सेमीफायनलमध्ये धडक मारली. संजू सॅमसन भारताच्या या विजयाचा खरा स्टार ठरला. त्याने ९७ धावांच्या या खेळीत संयम आणि आक्रमक फटके यांचा योग्य मिलाप घडवत संघाला विजय मिळवून देत नाबाद परतला. संजू सॅमसनने सर्व फलंदाजांबरोबर महत्त्वपूर्ण भागीदारी रचल्या. जसप्रीत बुमराहने सामन्यानंतर संजूचं कौतुक केलं. पण सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट या खेळाडूचे दोन चौकार असल्याचं त्याने सांगितलं.

टीम इंडियाने नाणेफेक जिंकत खूप चांगली सुरूवात केली होती. गोलंदाजीत भलेही पॉवरप्लेमध्ये फारसे विकेट्स घेता आले नाहीत. पण संघाने भेदक गोलंदाजी करत वेस्ट इंडिजला सहजी धावा करू दिल्या नाही. जसप्रीत बुमराहच्या एका षटकातील दोन विकेट्समुळे वेस्ट इंडिजला मोठा धक्का बसला. पण होल्डर व पॉवेल यांनी संघाला १९५ धावांवर नेत मोठी मजल मारली.

१९६ धावांच्या खेळीचा पाठलाग करताना भारताने लवकर दोन विकेट्स गमावल्या. यानंतर संजू व सूर्याने ५८ धावांची भागीदारी रचली. यानंतर तिलक वर्मासह संजूने ४२ धावांची तर हार्दिक पंड्यासह ३८ धावांची भागीदारी रचली. हार्दिक पंड्या शामर जोसेफच्या १९व्या षटकात झेलबाद झाला. यानंतर शिवम दुबे फलंदाजीला आला.

काय ठरला भारताच्या विजयाचा टर्निंग पॉईंट?

हार्दिक बाद झाला तेव्हा संघाला १० चेंडूत १७ धावांची गरज होती. शिवम दुबेने त्याच्या खेळीतील पहिल्याच चेंडूवर चौकार मारला आणि संजूवरचं प्रेशर रिलीज केलं. यानंतर पुढचा चेंडू डॉट खेळत त्याने पाचव्या चेंडूवर अजून एक चौकार मारला. या दोन चौकारांमुळे अखेरच्या षटकात चेस करण्यासाठी फार कमी धावा शिल्लक राहिल्या आणि भारताला विजय मिळवण्यात मदत झाली.

जसप्रीत बुमराहने सामन्यानंतर बोलताना संजू सॅमसनच्या खेळीचं कौतुक केलं. त्यानंतर त्याला सामन्यातील टर्निंग पॉईंटबद्दल विचारलं तेव्हा बुमराह म्हणाला, “दुबेने मारलेल्या त्या दोन चौकारांची नोंद कदाचित क्रिकेटच्या आकडेवारीत किंवा पुस्तकांत फारशी घेतली जाणार नाही. पण ज्यांना खरं क्रिकेट समजतं, त्यांना माहिती आहे की त्या दोन चौकारांमुळे शेवटच्या षटकात आमच्यावर तितका दबाव राहिला नाही. कारण काही वेळेस अखेरच्या षटकात ८-९ धावा करणं खूप अवघड होऊन जातं.”

शिवम दुबेने या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत ४ चेंडूत ८ धावा केल्या आणि संजूला मोक्याच्या क्षणी चांगली साथ देत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.