Jasprit Bumrah Replacement: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १३ सप्टेंबरला दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला देखील संघात स्थान देण्यात आलं आहे. पण तो खेळणार की नाही, हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असणार आहे. बुमराह सध्या बंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये आपली फिटनेस पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. दरम्यान बुमराहच्या फिटनेसबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
जसप्रीत बुमराहला दुखापतींमुळे अनेक महत्वाच्या मालिकेतून बाहेर राहावं लागलं आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यासाठी बुमराहला देखील संघात स्थान देण्यात आलं होतं. पण पूर्णपणे फिट नसल्याने त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. आता अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेतूनही बाहेर झाला, तर बीसीसीआयने त्याचा रिप्लेसमेंट तयार ठेवला आहे.
बुमराहच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेआधी फिटनेस टेस्ट देणार आहे. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या मालिकेआधी ९ सप्टेंबरला बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये एक सामना होणार आहे. या सामन्यात बुमराह गोलंदाजी करताना दिसेल. हीच त्याची फिटनेस टेस्ट असणार आहे. त्यानंतर तो अफगाणिस्तानविरुद्धची टी -२० मालिका खेळण्यासाठी रवाना होणार आहे.
भारतीय संघ येत्या काही दिवसात भारतीय संघ कसोटी आणि वनडे सामन्याची मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. या मालिकेआधी बुमराहने सराव व्हावा म्हणून भारतीय अ संघासाठी खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान बुमराहची रिप्लेसमेंट म्हणून प्रिन्स यादवला खेळण्याची संधी मिळू शकते. बुमराह बऱ्याचदा दुखापतीमुळे संघाबाहेर असतो, त्यामुळे बीसीसीआय त्याच्या जागी गोलंदाजी करणाऱ्या वेगवान गोलंदाजाच्या शोधात आहे. सध्या प्रिन्य यादव हे नाव आघाडीवर आहे.
