ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेत भारताला 2-1 ने विजय मिळवून देण्यात महत्वाचा वाटा असलेल्या जसप्रीत बुमराहचं, माजी पाकिस्तानी गोलंदाज वासिम अक्रमने तोंडभरुन कौतुक केलं आहे. सध्याच्या घडीला क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह टाकत असलेला यॉर्कर चेंडू हा सर्वोत्तम असल्याचं मत अक्रमने व्यक्त केलं आहे. तो नवी दिल्लीत पीटीआयशी बोलत होता.

अवश्य वाचा – इंग्लंड लायन्स विरुद्ध अजिंक्य रहाणे भारत अ संघाचा कर्णधार

आपल्या काळात वासिम अक्रम हा पाकिस्तानी संघाच्या गोलंदाजीचा कणा मानला जायचा. वासिमच्या भेदक गोलंदाजीचा सामना करताना अनेक दिग्गज खेळाडूंची तारेवरची कसरत व्हायची. “बुमहारची शैली ही इतर गोलंदाजांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. मात्र असं असलं तरीही तो चेंडू हवेमध्ये चांगला वळवतो. मात्र सातत्याने यॉर्कर चेंडू टाकण्याची क्षमता ही त्याला इतर गोलंदाजांपेक्षा वेगळं ठरवते. सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमध्ये बुमराहसारखा यॉर्कर चेंडू कोणीही टाकू शकत नाही. आमच्या काळात वकार युनूस आणि मी वन-डे प्रमाणेच कसोटी क्रिकेटमध्येही यॉर्कर चेंडू टाकायचो. बमुराहची आता तसंच करतोय.” अक्रम बुमराहच्या गोलंदाजीचं कौतुक करत होता.

यावेळी वासिम अक्रमने ऑस्ट्रेलियात कसोटी आणि वन-डे मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाचंही कौतुक केलं. विराट आणि त्याच्या संघाने आपल्या कामगिरीत ज्या प्रकारे सातत्य राखलं आहे त्याचं कौतुक करायलाच हवं, असं अक्रम म्हणाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या मालिकेत भारतीय संघ 5 वन-डे आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : मालिका विजयासोबत भारतीय संघाच्या खात्यात अनोख्या विक्रमाची नोंद