करोनामुळे स्थगित झालेला आयपीएलचा २०२१ हंगाम आजपासून सुरू झाला आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे कट्टर प्रतिस्पर्धी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने आहेत. पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिरातीतच टी-२० वर्ल्डकप स्पर्धा होणार असल्याने ही लीग फार महत्त्वाची ठरणार असून, प्रेक्षकांच्या पुनरागमनामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावण्यात हातभार लागणार आहे. दरम्यान, जसप्रीत बुमराहला चेन्नईविरुद्धच्या सामन्यात खास जर्सी मिळाली आहे.

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आपला १००वा आयपीएल सामना खेळत आहे. मुंबई इंडियन्सच्या या वेगवान गोलंदाजाने आज चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ही कामगिरी केली. IPL २०२१ चा दुसरा टप्पा आजपासून दुबईत सुरू होत आहे. बुमराहने २०१३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो फक्त मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे. बुमराह आयपीएलमध्ये १०० सामने खेळणारा ४५ वा खेळाडू आहे.

आयपीएल २०२१ चा पहिला टप्पा बुमराहसाठी फारसा चांगला नव्हता. त्याने सात सामन्यांत फक्त सहा विकेट्स घेतल्या. त्याचा इकॉनमी रेट ७.११ आणि स्ट्राइक रेट २७.०० होती.

मुंबई इंडियन्स सहा ताऱ्यांवर लक्ष

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि राहुल चहर या सहा जणांची ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाल्याने आपसूकच त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. याशिवाय ट्रेंट बोल्ट, किरॉन पोलार्ड आणि क्विंटन डीकॉक या विदेशी त्रिकुटाने मुंबईसाठी सातत्याने योगदान दिले आहे. मुंबईने सुरुवातीपासूनच जम बसवल्यास यंदा सलग तिसऱ्यांदा चषक उंचावण्यापासून त्यांना रोखणे कठीण जाईल.

चेन्नई सुपर किंग्ज  वचपा घेण्यासाठी सज्ज

‘आयपीएल’ स्थगित होण्यापूर्वी झालेल्या अखेरच्या लढतीत मुंबईनेच २१९ धावांचे लक्ष्य गाठून चेन्नईला धूळ चारली होती. त्या पराभवानंतरही महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई संघ गुणतालिकेत मुंबईपेक्षा वरच्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू सॅम करन विलगीकरणामुळे या लढतीला मुकण्याची शक्यता असली, तरी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत छाप पाडणारा शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा आणि दीपक चहर असे पर्याय चेन्नईकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे चेन्नईला गतपराभवाचा वचपा काढून गुणतालिकेत अग्रस्थान पटकावण्याची संधी आहे.