मुंबई इंडियन्सच्या संघाने यंदाच्या आयपीएल मोहिमेची सुरूवात विजयाने केली. पण त्यानंतर संघाने सलग चार सामने गमावले आहत. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा फॉर्म हा मुंबईसाठी सध्या चिंतेचा विषय आहे. त्याचबरोबर जसप्रीत बुमराहने गेल्या ५ सामन्यांमध्ये एकही विकेट घेऊ शकलेला नाही. बुमराह मात्र त्याचं १०० टक्के देत विकेट घेण्यासाठी आणि चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. पण यादरम्यान बुमराह स्वत:वर राग काढताना दिसला.

वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर जसप्रीत बुमराह स्पष्टपणे निराश दिसला. या सामन्यातही त्याला एकही विकेट मिळाली नाही. बुमराहने आपल्या ४ षटकांत एकही विकेट न घेता ४१ धावा दिल्या. या हंगामात बुमराहला अजून एकही विकेट मिळालेली नाही आणि त्यामुळे त्याच्यावरचा दबाव वाढताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, शेवटचं षटक पूर्ण झाल्यानंतर बुमराह रागाने ओरडताना दिसत आहे. त्यानंतर त्याने आपला रन-अप मार्कर उचलून रागात दूर फेकल्याचंही पाहायला मिळालं, हा व्हीडिओ आरसीबीविरूद्ध सामन्यादरम्यानचा आहे.

जसप्रीत बुमराह भारताला आणखी एक टी-२० वर्ल्डकप जिंकून दिल्यानंतर आयपीएल २०२६ मध्ये उतरला आहे. त्या स्पर्धेत तो संयुक्तरीत्या सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता आणि त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी तो मोठा प्रभावी ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात बुमराहची कामगिरी निराशाजनक ठरली आहे.

आतापर्यंत १९ षटकांत त्याने १६४ धावा दिल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट ८.६३ आहे. जरी त्याने धावांचा वेग काही प्रमाणात रोखला असला, तरी विरोधी फलंदाजांनी त्याच्याविरुद्ध सहज खेळ केल्याचं दिसून आलं. गुरुवारी श्रेयस अय्यरने त्याच्यावर आक्रमण करत पंजाबला सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवून दिलं.