Jasprit Bumrah To Miss T20 WC Opening Match: टी-२० विश्वचषक २०२६ मधील भारतीय संघाचा पहिला सामना आज ७ फेब्रुवारीला अमेरिकाविरूद्ध होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पहिल्याच सामन्यात खेळू शकणार नसल्याचं समोर आलं आहे. तर संघ निवडीसाठी फक्त १३ खेळाडू उपलब्ध असतील, अशी माहितीही समोर आली आहे, पाहूया नेमकं काय घडलं?

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील गतविजेता भारतीय संघ टी-२० विश्वचषकाचं जेतेपद राखण्यासाठी स्पर्धेत उतरणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टीम इंडिया पहिला सामना खेळत मोहिमेला सुरूवात करणार आहे. पण पहिल्याच सामन्यात बुमराह मात्र खेळणार नसल्याचं कळत आहे. वॉशिंग्टन सुंदर आधीच अनुपलब्ध असल्याने, भारताकडे त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडण्यासाठी फक्त १३ खेळाडू आहेत. सुंदर दुखापतीतून सावरत आहे आणि सध्या तो बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आहे.

जसप्रीत बुमराह पहिल्या सामन्यातून का होणार बाहेर?

द इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, बुमराहला वायरल ताप येत आहे आणि भारतीय संघ व्यवस्थापन त्याला विश्रांती देईल आणि तो मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध खेळणार नाही. सामन्याच्या एक दिवस आधी बुमराह मैदानावर आला होता, पण त्याने सराव केला नाही. जर बुमराहला खेळण्याची परवानगी दिली नाही तर मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते. शुक्रवारी सिराजला भारतीय संघात स्थान देण्यात आलं. हर्षित राणाला सराव सामन्यात गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर झाला आहे आणि त्याच्या जागी मोहम्मद सिराजला वर्ल्डकप संघात संधी दिली आहे.

भारताच्या प्लेईंग इलेव्हनबाबत बोलायचं तर अभिषेक शर्मासोबत इशान किशन डावाची सुरुवात करेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात इशानने सलामीवीर म्हणून ५३ धावा केल्या. त्याने तिरुअनंतपुरममध्ये न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १०३ धावा केल्या. संजू सॅमसन फॉर्ममध्ये नसल्याने, भारताला वरच्या फळीत कामगिरी करण्यासाठी किशनवर अवलंबून राहावे लागत आहे.

अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरबद्दल अजूनही अनिश्चितता आहे. सुंदरला न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान दुखापत झाली होती, ज्यामुळे तो टी-२० मालिकेत खेळू शकला नाही. तेव्हापासून, तो बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) येथे वैद्यकीय पथक आणि प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली फिटनेस परत मिळवत आहे. टीम इंडियाला त्याच्या पुनरागमनाची आशा असल्याने त्याच्या जागी बदली खेळाडूची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही.

टी-२० वर्ल्डकपसाठी भारताचा संघ

अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन.