नवी दिल्ली : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा पाठीच्या दुखापतीमुळे आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकणार असल्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी माहिती दिली.

ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरपासून रंगणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी बुमराच्या उपलब्धतेबाबत गेल्या काही दिवसांपासून संभ्रम होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला (२७ सप्टेंबर) झालेल्या भारताच्या सराव सत्रादरम्यान बुमराने पाठदुखीची तक्रार केली. त्यानंतर तो बंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला. तेथे त्याच्या काही चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर तो ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले.

‘‘बुमरा ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचे ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीत पथकाने स्पष्ट केले आहे. वैद्यकीय अहवालाचे मूल्यांकन आणि तज्ज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या निवेदनात सचिव जय शहा यांनी म्हटले आहे.

भारतीय संघात बुमराची जागा कोण घेणार हे सांगण्यात आले नाही. दीपक चहर आणि मोहम्मद शमी यांची भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे. या दोघांपैकी एकाचा मुख्य संघात समावेश होण्याची शक्यता आहे