१९ जुलै २०२३ ही तारीख म्हणजे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी भळभळती जखम आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अपराजित राहणाऱ्या भारतीय संघाला फायनलमध्ये अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागलं. घरच्या मैदानावर लाखभर चाहत्यांच्या साक्षीने भारतीय संघ जेतेपदाचा करंडक उंचावणार अशी खात्री होती. मात्र पॅट कमिन्सच्या ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला निरुत्तर केलं. अश्रूभरल्या डोळ्यांनी भारतीय खेळाडूंनी चाहत्यांचा निरोप घेतला. या सामन्याला आता जवळपास तीन वर्ष झाली आहेत. त्या सामन्यानंतर थेट उद्या इंग्लंडविरुद्ध जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी वनडे खेळणार आहे. टी२० मालिकेत सपाटून हरलेला भारतीय संघ वनडे मालिकेत चांगली कामगिरी करण्यासाठी आतूर आहे.
जसप्रीत बुमराहला कारकिर्दीत अनेक दुखापतींनी सतावलं आहे. तिन्ही प्रकारात तसंच आयपीएलमध्ये खेळत असल्यामुळे बुमराहला दुखापत होण्याची शक्यता वाढते. यामुळे बुमराहसंदर्भात वर्कलोड मॅनेजमेंट लागू केलं जातं. तीन वर्षात अनेक वनडे मालिकांसाठी बुमराहला विश्रांती देण्यात आली. काही स्पर्धा तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. या काळात टी२० वर्ल्डकप असल्यामुळे वनडे सामन्यांची संख्याही कमी होती. जवळपास तीन वर्षात बुमराह भारतासाठी २६ वनडेत खेळू शकला नाही. संघाचा प्रमुख गोलंदाजच वनडे सामने खेळत नसेल तर या फॉरमॅटचं भविष्य फार उज्वल नाही हेही स्पष्ट होतं.
भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे मालिका, इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर असताना झालेली वनडे मालिका, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिका तसंच दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानविरुद्ध बुमराह खेळलेला नाही. यापैकी चॅम्पियन्स ट्रॉफी ही आयसीसीतर्फे आयोजित केली जाणारी स्पर्धा आहे. मिनी वर्ल्डकप असं त्याला संबोधलं जातं. मात्र दुखापतीमुळे बुमराह या महत्त्वपूर्ण स्पर्धेत खेळू शकला नाही.
घोटीव यॉर्कर, अडचणीत टाकणारे उसळते चेंडू, फसवे स्लोअरवन अशी भात्यात विविध अस्त्रं असणारा बुमराह संघात असणं ही कर्णधारासाठी आश्वासक गोष्ट असते. मात्र प्रमुख गोलंदाज असूनही बुमराह या फॉरमॅटपासून दूर राहिला आहे किंवा त्याला दूर राहावं लागलं आहे. कसोटी मालिकेसाठी बुमराह फिट असेल तर त्याला प्राधान्य दिलं जातं. मात्र सलग पाच दिवस खेळण्याचा परिणाम बुमराहच्या शरीरावर दिसून येतो. बुमराहला पाठीच्या गंभीर दुखण्याने त्रस्त केलं आहे. बुमराहला तिन्ही प्रकारात सातत्याने खेळवल्यास त्याची कारकीर्द धोक्यात येऊ शकते असा इशारा न्यूझीलंडचे माजी वेगवान गोलंदाज आणि प्रशिक्षक शेन बॉन्ड यांनी दिला होता. बॉन्ड यांना कारकिर्दीत सातत्याने दुखापतींनी हैराण केलं.
दरम्यान या तीन वर्षात बुमराह भारतासाठी २१ कसोटी आणि ३३ टी२० सामने खेळला. २०२४ टी२० वर्ल्डकपमध्ये बुमराहला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. २०२६ टी२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये बुमराहला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. याव्यतिरिक्त या तीन वर्षात बुमराह आयपीएलचे तिन्ही हंगाम खेळला २०२४ मध्ये १३, २०२५ मध्ये १२ तर २०२६ मध्ये १३ सामने खेळला. कसोटी आणि टी२० प्रकाराला प्राधान्य देण्यात आल्याने बुमराह वनडे प्रकारात खेळू शकला नाही.
टी२० क्रिकेटच्या आक्रमणानंतर वनडे क्रिकेटचं भवितव्य धोक्यात आहे. जगभरात विविध देशांमध्ये टी२० लीग सुरू झाल्या आहेत. पारंपरिक प्रकार म्हणून कसोटी सामने खेळवले जातात. मात्र वनडे सामन्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. आयसीसीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत वनडे लढतींचं स्वरुप बदलावं असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. वनडे सामने प्रत्येकी ४० षटकांचे असावेत असा प्रस्ताव आहे. तूर्तास या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही पण नजीकच्या काळात वनडे प्रकारात बदल होऊ शकतो.
भारतीय संघ जगात कुठेही खेळत असला तरी चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. जसप्रीत बुमराहचा खेळ याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी असंख्य चाहते उत्सुक असतात. मात्र टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज वनडेपासून तीन वर्ष दूर राहणं आश्चर्यचकित करणारं आहे. वनडे प्रकारात बुमराहने ८९ लढतीत भारताचं प्रतिनिधित्व केलं असून त्याच्या नावावर १४९ विकेट्स आहेत. वनडेत डावात पाच विकेट्स घेण्याची करामत त्याने दोनदा केली आहे.
वर्ल्डकप फायनलमध्ये काय घडलं होतं?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना चाचपडत २४० धावांची मजल मारली. केएल राहुलने १०७ चेंडूत ६६ धावांची संथ खेळी केली. विराट कोहलीने ५४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल स्टार्कने ३ तर जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ४७/३ अशी झाली होती. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी विकेट पटकावण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले मात्र नशिबाने त्यांना साथ दिली नाही. बुमराहने अनेकदा हेडला चकवलं. कधी चेंडू त्याच्या हाताला तर कधी ग्लोव्ह्जला लागून हवेत उडाला तर कधी एलबीडब्ल्यूची संधी होती. ट्रॅव्हिस हेडने नाबाद १५ चौकार आणि ४ षटकारांसह १३७ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. मार्नस लबूशेनने ५८ धावांची खेळी करत हेडला चांगली साथ दिली. या दोघांनी सगळ्यात आधी विकेट्सची पडझड रोखली आणि त्यानंतर चौथ्या विकेटसाठी १९२ धावांची भागीदारी साकारली आणि ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं.
