Impact Player Medal of IND vs WI Video: भारताने टी-२० विश्वचषकातील करो या मरो सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक मारली. भारताने स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी केली. प्रत्येक सामन्यात कोणी ना कोणी नवा खेळाडू मॅचविनर म्हणून समोर आला. वेस्ट इंडिजविरूद्ध सामन्यात संजू सॅमसनने ९७ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. पण इम्पॅक्ट प्लेअर मेडल मात्र वेगळ्याच खेळाडूला मिळालं.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यामध्ये भारताने सुरूवातीला भेदक गोलंदाजी करत वेस्ट इंडिजला धावा करू दिल्या नाहीत. पॉवरप्लेमध्ये भारत विकेट घेण्यात अपयशी ठरला असला तरी धावांचा वेग मात्र कमी ठेवला. गोलंदाजी भारताकडून वरूण चक्रवर्तीने संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्यानंतर बुमराहने १२व्या षटकात दोन विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये त्याने लयीत असलेल्या शिमरॉन हेटमायरला आणि मोठे फटके खेळत असलेल्या रॉस्टन चेसला बाद केलं. याशिवाय हार्दिकने एक विकेट घेतली आणि वेस्ट इंडिजला १९५ धावांवर रोखलं. बुमराहने अखेरच्या षटकात २ डॉट बॉल टाकले.
धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन सलामीला उतरला आणि संघाला विजय मिळवून देत माघारी परतला. संजूला या सामन्यात सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा व शिवम दुबे या फलंदाजांनी चांगली साथ देत महत्त्वपूर्ण भागीदारी रचल्या. तर संजूने एका टोकाकडून संघाचा डाव सावरून धरत ५० चेंडूत १२ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ९७ धावा केल्या. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
तर ड्रेसिंग रूममधील इम्पॅक्ट प्लेअर मेडल मात्र जसप्रीत बुमराहला देण्यात आलं. टीम इंडियाचे फिल्डिंग कोच टी दिलीप यांनी बुमराह विजेता असल्याचं घोषित केलं. बुमराहने या सामन्यात ४ षटकांत ३६ धावा देत २ विकेट्स घेतल्या. एका षटकात दोन विकेट्स घेतल्यामुळे वेस्ट इंडिज १५-२० धावांनी मागे राहिला, ज्याचा फायदा भारताला झाला.
इम्पॅक्ट प्लेअर मेडल घेतल्यानंतर बुमराहने कोणत्या खेळाडूंचं कौतुक केलं?
जसप्रीत बुमराहने इम्पॅक्ट प्लेअर मेडल मिळाल्यानंतर फिल्डिंग कोचचे आभार मानले. यानंतर त्याने शिवम दुबेचा खास उल्लेख करत त्याने १९व्या षटकात मारलेले दोन चौकार महत्त्वपूर्ण ठरले आणि ज्यामुळे संघावर दबाव आला नाही, असं म्हटलं. यानंतर त्याने संघाला पुढील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील हा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
