Jasprit Bumrah Slower Ball: जगातील सर्वाेत्कृष्ट वेगवान गोलंदाज अशी ओळख मिळवलेला जसप्रीत बुमराह टी-२० विश्वचषकात भारतासाठी गेमचेंजर ठरला. नवीन चेंडू असो मधल्या षटकांत गोलंदाजी करणं असो वा डेथ ओव्हर्समध्ये धावा वाचवणं असो, बुमराह सगळी कामं अगदी चोख पार पाडतो. टी-२० विश्वचषकातील सेमीफायनल, फायनल सामन्यात बुमराहच्या भेदक गोलंदाजीचा प्रत्यय पुन्हा आला. बुमराहचे यॉर्कर तर फलंदाजांसाठी मोठं कोडं असतं. पण यंदाच्या विश्वचषकात बुमराहचे स्लोअर बॉल सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरत होते. यादरम्यान बुमराहच्या गोलंदाजीबाबत एका खेळाडूने मोठा खुलासा केला आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धेत बुमराहला बहुतांश विकेट्स स्लोअर डिलिव्हरीमुळे मिळाल्या. यादरम्यान एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक गोलंदाज म्हणतोय की स्लोअर चेंडू कसे टाकायचे हे मी बुमराहला शिकवलं आहे. हा गोलंदाज पाकिस्तानमध्ये जन्मलेला युएईकडून क्रिकेट खेळत असलेला जहूर खान आहे.
कोण आहे बुमराहला स्लोअरवन शिकवणारा गोलंदाज जहूर खान?
झहूर खान हा २०१९ मध्ये आयपीएलदरम्यान बुमराहला त्याच्या बॉलिंग अॅक्शनमध्ये कोणताही बदल न करता स्लोअर चेंडू कसे टाकायचे हे शिकवले होतं. झहूरने सांगितलं की तो स्पर्धेच्या यूएई लेगमध्ये मुंबई इंडियन्ससोबत नेट बॉलर होता आणि तिथेच बुमराहने त्याच्याशी बॉलिंग टेक्निकवर चर्चा केली. जहूरने म्हटलं की, बुमराह त्यावेळी स्लो चेंडू टाकत होता, परंतु त्याने भारतीय स्टारला त्याचे टेक्निक विकसित करण्यास मदती केली.
एका व्हिडिओमध्ये बोलताना गोलंदाजी प्रशिक्षक जहूर खानने एक रंजक किस्सा सांगितला., “मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बुमराह आधीही स्लोअर बॉल टाकायचा, पण तो नेहमीच्या अॅक्शनमध्ये टाकायचा. अबूधाबीमध्ये झालेल्या एका सामन्यात तो, ट्रेंट बोल्ट आणि नॅथन कुल्टर-नाईल यांच्या गोलंदाजीवर खूप धावा कुटल्या होत्या. त्या वर्षी सप्टेंबरमध्ये आयपीएल सुरू होती. सप्टेंबरमध्ये यूएईमध्ये तापमान जवळपास ५० अंशांपर्यंत पोहोचतं. इतकी उष्णता असते की रात्रीसुद्धा चेंडू नीट पकडता येत नाही, कारण तो ओलसर होतो,” असं जहूरने सांगितलं.
जहूर पुढे म्हणाला, “मग मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून मला बोलावणं आलं. मी सहा दिवस क्वारंटाईनमध्ये होतो आणि सातव्या दिवशी सरावासाठी गेलो. त्या रात्री मी संघासोबत होतो. झहीर खान आणि रॉबिन सिंग मला ओळखत होते, कारण मी T10 लीगमध्ये मेडन ओव्हर टाकली होती. मी पहिला चेंडू यॉर्कर टाकला आणि पुढचे पाच चेंडू स्लोअर होते. आम्ही सगळे एकत्र बसलो होतो. समोर बुमराह बसला होता, बाजूला रोहित शर्मा होता आणि मीही तिथे बसून हे सगळं पाहत होतो.”
झहूर खानने पुढे सांगितलं, “मी त्याला म्हटलं की त्याच अॅक्शनमध्ये आणि त्याच ग्रिपने स्लोअर बॉल टाकायचा. तेव्हा तो म्हणाला, ‘हे कसं शक्य आहे?’ मी म्हणालो, सरावात दाखवतो. तो म्हणाला, ‘ठीक आहे, पुढच्या सरावात तुझी ग्रिप मला दाखव.’ मीही होकार दिला.” सरावाच्या वेळी ते गोलंदाजी करत होते. त्या वेळी शेन बॉन्ड हे मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक होते आणि महेला जयवर्धने नेट्सच्या मागे उभे होते. झहूरने सांगितलं, “मी एक स्लोअर बाउन्सर टाकला आणि फलंदाज तो चेंडू खेळायला चुकला. तेव्हा शेन बॉन्ड म्हणाले, ‘तुझी ग्रिप काय आहे? तू ऑफ-कटर टाकतोस का?’ मी म्हणालो, ‘नाही, ही तीच ग्रिप आहे.’”
“मी त्यांना ग्रिप दाखवली आणि दोन-तीन स्लोअर बॉल टाकले. तेव्हा बॉन्डने जयवर्धनेला सांगितलं की क्रिकेटमध्ये ही नवी गोष्ट आहे. ते म्हणाले, ‘पाहा, हा किती छान स्लोअर बॉल टाकतो, त्याच अॅक्शन आणि त्याच आर्म स्पीडने.’”
झहूर खान पुढे म्हणालe, “एक-दोन दिवसांनी मी जसप्रीत बुमराहसोबत नेट्समध्ये गोलंदाजी करत होतो. तेव्हा बुमराह म्हणाला, ‘पाजी, तुझी ग्रिप काय आहे, दाखव ना.’ मग मी त्याला ती ग्रिप दाखवली आणि सांगितलं की चेंडू त्याच अॅक्शनने टाकायचा. त्याने चेंडू टाकून पाहिला आणि म्हणाला, ‘हे तर नेक्स्ट लेव्हल आहे.’ मी सध्या यूएईसाठी खेळणारा खेळाडू आहे आणि तो जगातील अव्वल गोलंदाज आहे. त्यामुळे त्याने माझ्याकडून काही शिकण्याची तयारी दाखवली, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती,” असं झहूर खानने सांगितलं.
