Sourav Ganguly Javagal Srinath 2001 Toss Controversy: भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांची आज एक उत्कृष्ट मॅच रेफरी म्हणून ओळख आहे. खेळाडू म्हणून अत्यंत यशस्वी कारकीर्द गाजवल्यानंतर, श्रीनाथ यांनी सामना पंच म्हणूनही मोठी ख्याती मिळवली आहे. अनेक प्रमुख स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करताना खेळाची प्रतिष्ठा आणि खिलाडूवृत्ती जपण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. श्रीनाथ यांनी नेहमीच हमीच निष्पक्षपणे निर्णय घेतले आहेत. दरम्यान त्यांनी सौरव गांगुलीला मी बॅन केलं असतं, असा २५ वर्षांनंतर खुलासा केला आहे.
जवागल श्रीनाथ अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते, जिथे त्यांना ईडन गार्डन्सवर २००१ मध्ये झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी सामन्यादरम्यान सौरव गांगुलीशी संबंधित एका गाजलेल्या वादाबद्दल विचारण्यात आलं. त्या सामन्यात, गांगुलीने नाणेफेकीसाठी (टॉससाठी) ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह वॉ याला वाट पाहायला लावली होती. जर आपण त्या सामन्याचे ‘मॅच रेफरी’ असता, तर आपण काय केलं असतं, असा प्रश्न श्रीनाथ यांना विचारण्यात आला.
जवागल श्रीनाथ सौरव गांगुलीबाबत असं का म्हणाले?
‘इमॅजिन’ वाहिनीवरील एका कार्यक्रमात त्या घटनेची आठवण सांगताना श्रीनाथ म्हणाले, “मी सौरववर काही सामन्यांची बंदी घातली असती.” विशेष म्हणजे, टॉससाठी स्टीव्ह वॉ यांना वाट पाहायला लावण्याची ती घटना गांगुलीच्या ‘माइंड गेम्स’चा एक भाग मानली जात असे; ज्यामुळे त्या गाजलेल्या मालिकेत वॉ आणि ऑस्ट्रेलियन संघ अस्वस्थ झाले होते. मात्र, नंतर गांगुलीने स्पष्ट केलं होतं की, आपला ब्लेझर न सापडल्यामुळेच त्याला विलंब झाला होता.
दरम्यान, श्रीनाथ यांनी गांगुलीच्या नेतृत्वाचं, आणि विशेषतः युवराज सिंग, हरभजन सिंग व वीरेंद्र सेहवाग यांसारख्या युवा खेळाडूंना घडवण्याच्या त्याच्या क्षमतेचंही कौतुक केलं. श्रीनाथ म्हणाले, “मॅच-फिक्सिंगच्या प्रकरणानंतर, भारतीय क्रिकेटची प्रतिमा पुन्हा उंचावण्याचा आणि भारतीय क्रिकेट उत्कृष्ट व स्वच्छ आहे हे जगाला सिद्ध करण्याचा निर्धार प्रत्येक भारतीय खेळाडूने केला होता आणि या कार्यात गांगुलीचं योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण होतं.”
१९९१ ते १९९७-९८ या काळात भारताला परदेशात विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला, पण १९९९ पासून परिस्थिती बदलू लागली, अशी आठवणही त्यांनी सांगितली. “मी नेहमी प्रथम फलंदाजी करावी आणि प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकावा, असा आग्रह धरणाऱ्यांपैकी एक होतो,” असं ते म्हणाले. मात्र सौरव गांगुलीचं मत वेगळं होतं. निर्णय झाल्यानंतर संघाने त्यानुसार पुढे जायला हवं होतं, पण त्या वेळी ऑस्ट्रेलिया खूपच बलाढ्य होता, असंही त्यांनी नमूद केलं.
