वृत्तसंस्था, सेंट लुइस
जावोखिर सिंदारोवने ‘कँडिडेट्स’ स्पर्धेत उत्कृष्ट खेळ केला. सध्याच्या घडीला तो जगज्जेत्या दोम्माराजू गुकेशपेक्षा अधिक प्रभावी दिसत आहे. त्यामुळे आगामी जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत सिंदारोवने गुकेशला पराभूत केल्यास आश्चर्य वाटणार नाही आणि तसे झाल्यास मॅग्नस कार्लसन जगज्जेतेपदासाठी पुन्हा आव्हान उपस्थित करण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही, असे मत दिग्गज बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव यांनी व्यक्त केले.

सायप्रस येथे नुकत्याच झालेल्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेत सिंदारोवने प्रतिस्पध्र्यांवर वर्चस्व गाजवले. त्याने एकही सामना न गमावता या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आणि जगज्जेतेपदासाठी गुकेशला आव्हान देण्याची संधी मिळवली.

‘‘सिंदारोवने ज्या पद्धतीने ‘कँडिडेट्स’ स्पर्धा जिंकली, ते अत्यंत प्रभावी होते. मी सहजासहजी प्रभावित होत नाही, पण त्याच्या खेळातील अचूकता, चालींची गुणवत्ता, दडपण सहन करण्याची आणि प्रतिस्पध्र्यावर उलट दडपण निर्माण करण्याची क्षमता विलक्षण आहे. गुकेश गेल्या काही काळापासून संघर्ष करत आहे. त्यामुळे सध्याच्या कामगिरीचा विचार करता जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत सिंदारोवचे पारडे जड वाटते,’’ असे सेंट लुइस चेस क्लबच्या यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कास्पारोव यांनी नमूद केले.

‘‘जगज्जेतेपदाची लढत अतिशय रंजक ठरेल यात शंका नाही. सध्याचा विश्वविजेता १९ वर्षांचा, तर आव्हानवीर २० वर्षांचा आहे. मात्र, बुद्धिबळातील सर्वांत बलाढ्य खेळाडू अजूनही ३५ वर्षीय कार्लसनच आहे. सिंदारोवने गुकेशला पराभूत केल्यास, कार्लसनला पुन्हा जगज्जेतेपदासाठी लढण्याची प्रेरणा मिळू शकते. मला सिंदारोव-कार्लसन सामना पाहायला आवडेल,’’ असे कास्पारोव म्हणाले.

सिंदारोव सर्वोच्च स्तरावर अजून नवखा आहे, पण तो खूप वेगाने प्रगती करत आहे. गुकेशने आधीच अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. सिंदारोवचा उदय अधिक वेगाने झाल्यासारखा वाटतो. गुकेश अत्यंत लढवय्या आहे. कोणतीही स्थिती असो, तो बचाव करत राहतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत संधी शोधतो. त्याला जगज्जेतेपदाचा अनुभव आहे, तर सिंदारोव प्रथमच इतकी मोठी लढत खेळणार आहे. त्यामुळे काहीही होऊ शकते. – गॅरी कास्पारोव, दिग्गज बुद्धिबळपटू