मुंबई : जागतिक बुद्धिबळात युवकांचे वर्चस्व दिवसेंदिवस ठळकपणे अधोरेखित होत असताना यंदा जगज्जेतेपदाची लढतही दोन ‘जेन झी’ प्रतिस्पर्धांमध्ये रंगणार आहे. २० वर्षीय जावोखिर सिंदारोव याने सायप्रस येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठेच्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेचे जेतेपद पटकावत आता बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वांत युवा जगज्जेता भारताचा १९ वर्षीय दोम्माराजू गुकेश याला सर्वोच्च किताबासाठी आव्हान देण्याची संधी मिळवली आहे.
उझबेकिस्तानच्या सिंदारोवने जगज्जेतेपदाचा आव्हानवीर ठरवणार्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेत वर्चस्व गाजवताना एक फेरी शिल्लक असतानाच जेतेपद पटकावले. त्याने १३व्या फेरीत अनिश गिरीला बरोबरीत रोखले आणि गुणतालिकेत अन्य प्रतिस्पर्धी आपल्याला गाठू शकणार नाहीत हे सुनिश्चित केले. दोन वर्षांपूर्वी पदार्पणातच ‘कँडिडेट्स’ जिंकणार्या गुकेशच्या कामगिरीची यंदा सिंदारोवने पुनरावृत्ती केली. आता नव्या दमाच्या, अलौकिक प्रतिभेच्या या खेळाडूंमधील जागतिक अजिंक्यपद लढतही चुरशीची होईल असे मानले जात आहे.
आजोबांकडून बुद्धिबळाचे धडे गिरवलेल्या सिंदारोवने वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी ‘ग्रँडमास्टर’ किताब मिळवला. त्यानंतर सातत्याने प्रगती करत त्याने बुद्धिबळविश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. त्याने गतवर्षी भारतात झालेली पुरुषांची विश्वचषक स्पर्धा जिंकून इतिहास घडवला. या स्पर्धेचा तो सर्वांत युवा विजेता ठरला. त्याआधी २०२२ मध्ये ऑलिम्पियाड स्पर्धेत उझबेकिस्तानला सुवर्णपदक मिळवून देण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. आता तो गुकेशविरुद्ध खेळेल. ही लढत केवळ जगज्जेतेपदापुरती मर्यादित नसून बुद्धिबळाच्या नव्या युगाचा चेहरा कोण, हेही ठरवण्याची शक्यता आहे.
विक्रमी दबदबा : अतिशय शिस्तबद्ध, पण तितकाच आक्रमक आणि सर्जनशील खेळाडू म्हणून ओळखल्या जाणार्या सिंदारोवने आपल्या वयापेक्षा कितीतरी अधिक पटीने परिपक्व खेळ यंदाच्या ‘कँडिडेट्स’मध्ये केला. त्याने या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक सहा विजय नोंदवले. जेतेपदासाठी दावेदार मानल्या गेलेल्या भारताच्या आर. प्रज्ञानंदवर त्याने दोनही डावांत सरशी साधली हे विशेष. प्रज्ञानंदच्या निराशाजनक कामगिरीमुळे दोन भारतीयांमध्ये जगज्जेतेपदाची लढत पाहण्याची संधी हुकली. परंतु ‘कँडिडेट्स’मधील वर्चस्वासह सिंदारोवने किताबासाठी चुरशीच्या लढतीची आशा निर्माण केली आहे.
सर्वांत युवा प्रतिस्पर्धी…
बुद्धिबळ जगज्जेतेपदासाठीची लढत यंदा कुठे आणि कधी होणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी ती विक्रमी ठरणार हे निश्चित आहे. गुकेश आणि सिंदारोव हे या प्रतिष्ठेच्या लढतीत आमनेसामने येणारे सर्वांत युवा बुद्धिबळपटू ठरतील. ते २०२४ मधील गुकेश विरुद्ध डिंग लिरेन लढतीचा विक्रम मोडतील. गेल्या लढतीवेळी गुकेश १८, तर लिरेन ३२ वर्षांचा होता. यंदाच्या लढतीवेळी गुकेश आणि सिंदारोव हे दोघेही २० वर्षांचे असतील. सिंदारोवपेक्षा गुकेश पाच महिन्यांनी लहान आहे.
महिलांमध्ये अखेरच्या फेरीपर्यंत चुरस
‘कँडिडेट्स’च्या महिला विभागातील चुरस अखेरच्या फेरीपर्यंत कायम राहिली आहे. स्पर्धेच्या शेवटून दुसर्या अर्थात १३व्या फेरीत भारताच्या आर. वैशालीने चीनच्या टॅन झोंगयीविरुद्ध बरोबरीची नोंद केली. त्याच वेळी ॲना मुझिचुकला बिबिसारा असाऊबायेवा, तर ॲलेक्सांड्रा गोर्याचकिनाला चीनच्या झू जिनेरकडून हार पत्करावी लागली. भारताच्या दिव्या देशमुखला कॅटरिना लायनोने पराभूत केले. त्यामुळे आज, बुधवारी होणार्या अखेरच्या फेरीपूर्वी आठपैकी सहा खेळाडूंना अग्रस्थानासाठी संधी आहे.
वैशाली आणि बिबिसारा समान ७.५ गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत, जिनेर (७ गुण) तिसर्या, तर गोर्याचकिना, मुझिचुक आणि लायनो ६.५ गुणांसह संयुक्तपणे चौथ्या स्थानी आहेत. अखेरच्या फेरीत वैशालीची लायनोशी, बिबिसाराची दिव्याशी, जिनेरची मुझिचुकशी, तर गोर्याचकिनाची झोंगयीशी गाठ पडणार आहे. अग्रस्थानासाठी दोन किंवा अधिक खेळाडूंत बरोबरी झाल्यास गुरुवारी ‘टायब्रेकर’ खेळवला जाईल.
