Jai Meena Soft Tennis Bronze Medal: भारतीय संघाच्या खात्यात आशियाई क्रीडा स्पर्धेतील अजून एका कांस्य पदकाची भर पडली आहे. टेनिसपटू जय मीना याने भारताला पहिल्यांदाच सॉफ्ट टेनिस या प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेचं पदक मिळवून दिलं आहे. क्रिकेटपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या जय मीनाने टेनिसचा मार्ग कसा निवडला, जाणून घेऊया.

जय मीनाने लहानपणी आपल्या क्रीडा कारकिर्दीचं एक वेगळंच स्वप्न पाहिलं होतं. मध्य प्रदेशातील देवासमध्ये वाढलेल्या जयला क्रिकेटपटू व्हायचं होतं. सॉफ्ट टेनिस हा खेळ त्याच्या प्लॅनिंगचा कधीच भाग नव्हता. पायोनियर पब्लिक स्कूलमध्ये त्याने पहिल्यांदा हा खेळ पाहिला, तेव्हाही केवळ कुतूहलापोटी तो थांबून सामना पाहायचा.

यानंतर जय बॉल बॉय म्हणून कोर्टवर काम करू लागला. चेंडू उचलताना आणि खेळाडूंचा खेळ पाहताना त्याची उत्सुकता हळूहळू आवडीत बदलली. आवड म्हणून त्याने हा खेळ खेळायला सुरुवात केली आणि अखेर सॉफ्ट टेनिसच त्याची कारकीर्द बनली. बुधवारी या अनपेक्षित प्रवासाला ऐतिहासिक वळण मिळालं. २०२६च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करत आशियाई क्रीडा स्पर्धेत सॉफ्ट टेनिसमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान जय मीनाने मिळवला.

२४ वर्षीय जयने फिलिपिन्सच्या नुगित शेरविनविरुद्धच्या रोमहर्षक उपांत्यपूर्व सामन्यात हा ऐतिहासिक पराक्रम केला. सामन्याची सुरुवात त्याच्यासाठी कठीण ठरली. पहिला गेम त्याने ०-४ असा गमावला, मात्र दुसऱ्या गेममध्ये ४-२ असा विजय मिळवत त्याने जोरदार पुनरागमन केलं. तिसऱ्या गेममध्ये पुन्हा जयला अडचणींचा सामना करावा लागला, पण त्याने हार मानली नाही. सलग दोन गेम जिंकत त्याने ३-२ अशी आघाडी मिळवली आणि सामना जिंकण्याची संधी निर्माण केली. मात्र, नुगितने सहाव्या गेममध्ये ४-२ असा विजय मिळवत सामना पुन्हा बरोबरीच्या दिशेने नेला.

या लढतीचा निकाल सात गुणांच्या टायब्रेकरमध्ये लागणार होता आणि तिथेही जय मीनावर दबाव कायम होता. तो ३-५ असा पिछाडीवर होता आणि आणखी एका निराशाजनक पराभवाच्या उंबरठ्यावर उभा होता. मात्र, त्याने निर्णायक क्षणी जबरदस्त पुनरागमन केलं. सलग चार गुण जिंकत जयने सामना आपल्या नावावर केला आणि उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.

उपांत्य फेरीत जय मीना याला जपानच्या ताकुया कुरोसका याने २-४च्या फरकाने पराभव पत्करावा लागला. पण तरीही त्याने भारतासाठी कांस्य पदक मात्र पटकावलं. यासह आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात सॉफ्ट टेनिसमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देणारा खेळाडू ठरला.

जय मीनाची सातत्यपूर्ण प्रगती

जयची ही कामगिरी त्याच्या सातत्याने सुरू असलेल्या प्रगतीतील आणखी एक मोठं पाऊल आहे. २०२२च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत तो पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचला होता. यावेळी मात्र त्याने आणखी एक पाऊल पुढे टाकत पदक निश्चित केलं. या आशियाई क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक आणि मिश्र दुहेरी अशा दोन्ही प्रकारांमध्ये पदकाच्या फेरीत पोहोचणारा जय हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्याचा सहकारी आर्यन ठाकूर मात्र गट फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडला.

जयच्या या यशाची चाहूल गेल्या काही वर्षांपासूनच लागली होती. २०२२च्या गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्याने पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकलं. त्यानंतर २०२५मध्ये तो या प्रकारात राष्ट्रीय विजेता ठरला. आंतरराष्ट्रीय स्तरावरही जयने २०२४मध्ये भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली. वर्ल्ड सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिलं पदक मिळवून देताना त्याने आध्या तिवारीसोबत मिश्र दुहेरीत कांस्यपदक पटकावलं होतं.