Jay Shah Handshake With Pakistan Womens Team Captain: येत्या काही दिवसात इंग्लंडमध्ये महिला टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. ही स्पर्धा सुरु होण्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसीचे) चेअरमन जय शाह यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात जय शाह हे पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार फातिमा सना हिच्याशी हस्तांदोलन (हॅंडशेक) करताना दिसून येत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला येत्या १२ जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेआधी आयसीसीचा कॅप्टन्स फोटोशूटचा अधिकृत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान आयसीसीचे चेअरमन जय शाह यांनी देखील हजेरी लावली होती. या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या र्व संघांचे कर्णधार उपस्थित होते. ट्रॉफीसोबत सर्व कर्णधारांनी फोटोशूट केलं. तसेच जय शाह आणि आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी सर्व कर्णधांराची भेट घेतली. यादरम्यान जय शाह हे पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिच्याशी हस्तांदोलन (हॅंडशेक) करताना दिसून आले. यावरुन चांगलाच वाद पेटला आहे.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानी खेळाडूंसोबत हँडशेक न करण्याचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानसोबत खेळणार, पण हँडशेक करणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर पुढील सर्व सामन्यांमध्ये असच काहीसं चित्र पाहायला मिळालं होतं. सामना सुरु होण्यआधी किंवा सामना संपल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हँडशेक करणं टाळलं होतं. पण आता जय शाह यांनी हँडशेक केल्यानंतर वादाला तोंड फुटलं आहे. खेळाडूंसाठी वेगळे नियम आणि अधिकाऱ्यांसाठी वेगळे नियम? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
जय शाह हे आयसीसीचे चेअरमन आहेत. त्यामुळे स्टेजवर असलेल्या प्रत्येक कर्णधारासोबत हँडशेक करणं हे नियमात होतं. या प्रकरणामागे कुठलाही राजकीय किंवा वादग्रस्त संदर्भ नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उपस्थित कर्णधारांचं स्वागत करणं ही त्यांची जबाबदारी होती. त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं, असं म्हटलं जात आहे. हा केवळ अधिकृत प्रोटोकॉलचा एक भाग होता. पण भारत- पाकिस्तानातील अतंर्गत तणावाच्या पार्श्वभूमीवर हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.
