scorecardresearch

मी अयशस्वी व्हावे अशी अनेकांची इच्छा! ; भारताचे माजी प्रशिक्षक शास्त्रींचे परखड मत

शास्त्री यांची २०१७ मध्ये भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली होती.

लंडन : भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणून मी अयशस्वी व्हावे अशी अनेकांची इच्छा होती. त्यामुळे इतरांच्या मताला फारसे महत्त्व देणे मी थांबवले, असे भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री सोमवारी म्हणाले.

शास्त्री यांची २०१७ मध्ये भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी हे पद गेल्या वर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत सांभाळले. त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अग्रस्थानी होता. तसेच भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या पर्वाची अंतिम फेरी गाठली. भारताने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्येही सातत्यपूर्ण कामगिरी केली. मात्र, अनेकांना माझे हे यश रुचले नाही, असे परखड मत शास्त्री यांनी इंग्लंडमधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.

‘‘भारतामध्ये तुम्ही एखाद्या क्षेत्रात अयशस्वी व्हावे अशी अनेकांची इच्छा असते. मी राष्ट्रीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेतलेले नाही. त्यामुळे मी यशस्वी झालो हे अनेकांना रुचले नाही. मात्र, मी इतरांच्या मतांकडे दुर्लक्ष करण्यास शिकलो. त्यांना महत्त्व देणे मी थांबवले,’’ असे शास्त्री म्हणाले.

‘‘भारतीय संघ परदेशात यशस्वी ठरावा, हे प्रशिक्षक म्हणून माझे मुख्य लक्ष्य होते. सर्व खेळाडूंनी एकत्रित येऊन सांघिक कामगिरी करणे गरजेचे असून कोणत्याही खेळाडूला वेगळी, खास वागणूक मिळणार नसल्याचे मी प्रशिक्षकपद स्वीकारल्यावर स्पष्ट केले होते. खेळाडूंना तंदुरुस्तीवर विशेष लक्ष देण्याची मी सूचना केली. तसेच खेळाडूंना आक्रमक शैलीत आणि निर्भीडपणे खेळण्यास सांगितले. विशेषत: ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी तुम्हाला शिवीगाळ केल्यास तुम्हीही मागे हटू नका, असे मी आमच्या खेळाडूंना बजावले होते. या गोष्टींमुळेच आमच्या संघाने यशस्वी कामगिरी केली,’’ असेही शास्त्री यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jealous gang wanted me to fail says ex coach ravi shastri zws