Jemimah Rodrigues Creates History: वुमन्स प्रीमियर लीगच्या चौथ्या सीझनला दणक्यात सुरूवात झाली आहे. आज स्पर्धेत पहिल्यांदाच डबल हेडर सामना खेळवला जात आहे. यातील पहिला सामना गुजरात जायंट्स आणि युपी वॉरियर्ज यांच्यात होत आहे. तर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुसरा सामना खेळवला जात आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामासाठी जेमिमा रॉड्रीग्जकडे नेतृत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
मुंबई इंडियन्सविरूद्ध सामन्यात मैदानात उतरताच जेमिमा रॉड्रीग्जने मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे. यापूर्वी वुमन्स प्रीमियर लीगमध्ये अशी कामगिरी कोणताच खेळाडू करू शकलेला नाही. जेमिमा रॉड्रीग्जने पहिल्याच सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि मुंबईला फलंदाजीसाठी पाचारण केलं. दिल्लीचा संघ तिन्ही सीझनमध्ये रनर अप राहिला आहे. त्यामुळे जेमिमाच्या नेतृत्त्वाखाली संघ जेतेपद पटकावण्याचा निर्णय घेईल.
WPL मध्ये संघाचं नेतृत्व करणारी सर्वात तरुण कर्णधार ठरली आहे. जेमिमा रॉड्रीग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार स्मृती मानधनाला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावे केला आहे. ती WPL मधील सर्वात तरुण कर्णधार ठरली होती, पण आता जेमिमाने बाजी मारली आहे. जेमिमाचं वय आता २५ वर्षे १२७ दिवस आहे. मानधनाने WPL २०२३ मध्ये २६ वर्षे २३० दिवस वय असताना संघाचं नेतृत्त्व केलं होतं.
मेग लॅनिंग गेल्या तीन सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत होती, परंतु फ्रँचायझीने तिला रिलीज केलं आणि ती आता यूपी वॉरियर्सची कर्णधार झाली आहे. WPL २०२६ च्या आधी, दिल्लीने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली होती आणि संघाची कमान जेमिमाकडे सोपवली होती.
गेल्या तीन हंगामात जेमिमा रॉड्रिग्ज दिल्ली कॅपिटल्ससाठी सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. तिने २७ सामन्यांमध्ये १३९.६६ च्या स्ट्राईक रेटने ५०७ धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने तीन अर्धशतकं झळकावली आहेत, ज्यामध्ये तिची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ६९ धावा आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघात लॉरा वोल्वार्ड, मारिजन कापसारखे वरिष्ठ खेळाडू असतानाही दिल्ली कॅपिटल्सने २५ वर्षीय जेमिमावर विश्वास दाखवत तिच्यावर नेतृत्त्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता जेमिमा रॉड्रिग्ज तीन वर्ष रनर अप राहिलेल्या दिल्ली संघाला जेतेपद पटकावून देणार का, यावर सर्वांच्या नजरा आहेत.
