Jemimah Rodrigues Post After Smriti Mandhana Wedding Called off: भारतीय महिला संघाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने पलाश मुच्छलशी होणारं लग्न रद्द केल्याचं पोस्ट करत जाहीर केलं. स्मृतीने पोस्ट केल्यानंतर काही वेळाने पलाश मुच्छलनेही पोस्ट करत त्यांचं नातं संपल्याचं म्हटलं. या घोषणेनंतर दोघांनीही एकमेकांना सोशस मीडियावर अनफॉलो केलं आहे. यादरम्यान स्मृतीची बेस्ट फ्रेंड जेमिमा रॉड्रीग्ज हिने केलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
स्मृती मानधना व पलाश मुच्छल यांचं लग्न २३ नोव्हेंबरला होणार होतं, पण स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आणि लग्न स्थगित झालं. यानंतर पलाश मुच्छलबद्दल सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं. दरम्यान स्मृतीने तिच्या इन्स्टाग्रामवरून लग्नासंबंधित सर्व फोटो, व्हीडिओ डिलीट केले होते. पण आता स्मृतीने लग्न मोडलं असल्याची पोस्ट केली व पलाशला अनफॉलो करत त्याच्याबरोबरचे सर्व फोटो तिने डिलीट केले आहे.
स्मृती मानधना व जेमिमा रॉड्रीग्ज या दोघीही एकमेकींच्या घट्ट मैत्रिणी आहेत. स्मृतीने तर अनेकदा जेमिमाला माझी छोटी बहिण असल्याचा उल्लेख केला आहे. स्मृती मानधनाच्या लग्नासाठी जेमिमा वुमन्स बिग बॅश लीग स्पर्धा अर्ध्यावर सोडून सांगलीला पोहोचली होती. लग्न सोहळा पार पडल्यानंतर जेमिमा उर्वरित स्पर्धा खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पुन्हा जाणार होती. पण स्मृतीचं लग्न स्थगित झाल्यानंतर या कठीण प्रसंगात तिला साथ देण्यासाठी जेमिमा तिच्याबरोबर थांबली.
जेमिमा रॉड्रीग्ज बिग बॅश लीग खेळण्यासाठी परत येत नसल्याचे तिच्या संघाने जाहीर केले, तेव्हा सर्वांनीच जेमिमाचं खूप कौतुक केलं. जेमिमाने स्मृतीच्या लग्नाचे अनेक फोटो शेअऱ केले होते. याचबरोबर तिचा साखरपुडा झाल्याची घोषणा करणारा खास व्हीडिओ जेमिमाने पोस्ट केला होता, तो व्हीडिओदेखील जेमिमाने हटवला.
स्मृती-पलाशचं लग्न मोडल्याच्या घोषणेनंतर जेमिमाने तिच्या इन्स्टाग्रामवर एका बँडचा गाणं गातानाचा व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये ऑलिव्हिया डीनचं ‘man i need’ हे गाणं तो बँड गाताना दिसत आहे. ‘be the man I Need’ या गाण्यातील या वाक्याने सर्वांचं लक्ष वेधलं. चाहते या पोस्टचा संदर्भ स्मृती-पलाशच्या प्रकरणाशी जोडत आहेत. जेमिमाने शेअर केलेला हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. स्मृतीला कायमचं पाठिंबा दिलेल्या जेमिमाने या पोस्टसह अप्रत्यक्षपणे तिच्याबरोबर असल्याचं तिने दाखवून दिलं.
आता भारतीय महिला संघ २१ डिसेंबरपासून श्रीलंकेविरूद्ध सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत खेळताना दिसणार आहे. या मालिकेत स्मृती मानधना खेळणार की नाही, यावर सर्वांच्या नजरा असतील.
