Jemimah Rodrigues Trolled Hugging Fatima Sana The Hundred: सध्या महिलांची द हंड्रेड स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत भारताच्या महिला खेळाडूंचा समावेश आहे. भारताची उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रोड्रीग्ज, रिचा घोष व अष्टपैलू दीप्ती शर्मा खेळत आहेत. यादरम्यान भारताची फलंदाज जेमिमा रोड्रीग्ज ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जेमिमाने पाकिस्तानची फलंदाज फातिमा सना हिला मिठी मारल्यामुळे तिचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिला ट्रोल केलं जात आहे.
भारताची स्टार महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्स हिच्यावर पाकिस्तानच्या महिला संघाची कर्णधार फातिमा सना हिला मिठी मारल्यामुळे वाद ओढवला आहे. भारत-पाकिस्तान संबंध सध्या अत्यंत तणावपूर्ण असून, भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानविरुद्ध ‘नो हँडशेक’ धोरण स्वीकारलं आहे. पुरूष क्रिकेट संघाने आशिया चषक २०२५ मध्ये हँडशेक न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर पुढील सर्व स्पर्धांमध्ये हाच पवित्रा कायम ठेवला आणि महिला संघाने देखील आयसीसी स्पर्धांमध्ये नो हँडशेक धोरण कायम ठेवलं.
मात्र, द हंड्रेड स्पर्धेदरम्यान जेमिमाने फातिमाला मिठी मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान संबंध अधिक बिघडले. आशिया चषक २०२५मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. त्यानंतर टी-२० विश्वचषक २०२६मध्येही हेच धोरण कायम ठेवण्यात आलं.
याशिवाय, भारताच्या १९ वर्षांखालील आणि महिला संघानेही पाकिस्तानविरुद्ध ‘नो हँडशेक’ धोरणाचं पालन केलं. दोन्ही देशांतील तणावपूर्ण संबंधांमुळे विदेशी लीगमधील भारतीय मालकीच्या फ्रँचायझी पाकिस्तानी खेळाडूंना संधी देतील का, याबाबतही चर्चा रंगली होती. मात्र, सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानचा फिरकीपटू अब्रार अहमद याला संघात स्थान दिलं. या निर्णयावरूनही मोठा वाद निर्माण झाला आणि सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरं जावं लागलं.
वादाच्या पार्श्वभूमीवर जेमिमा रॉड्रिग्सने मैदानावर मात्र दमदार कामगिरी केली. द हंड्रेड स्पर्धेत सदर्न ब्रेव्हकडून खेळताना तिने बर्मिंगहॅम फिनिक्सविरुद्ध अवघ्या १८ चेंडूत २८ धावांची झंझावाती खेळी करत संघाला १४०/३ अशी भक्कम धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर सदर्न ब्रेव्हने हा सामना २४ धावांनी जिंकला. या विजयासह संघाने सलग चौथा विजय मिळवत विजयी घोडदौड कायम राखली.
