दिल्ली कॅपिटल्स संघाने वर्ल्ड चॅम्पियन जेमिमा रॉड्रीग्जला मोठं सरप्राईज दिलं आहे. दिल्लीने महिला प्रीमियर लीग २०२६ आधी मोठी घोषणा केली आहे. संघाला नवा कर्णधार मिळाली आहे. लिलावापूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने ऑस्ट्रेलियाची अनुभवी खेळाडू मेग लॅनिंगला रिलीज केलं, जी संघाची कर्णधार देखील होती आणि आता दिल्ली कॅपिटल्सने २५ वर्षीय जेमिमावर कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाच्या मार्केटिंग टीमने १४ डिसेंबरला जेमिमाला एका शूटसाठी बोलावलं होतं. यानंतर जेमिमा पोहोचल्यावर तिला सांगितलं गेलं की, तिला चाहत्यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधायचा आहे आणि त्यानंतर दिल्ली संघाचे सहमालक पार्थ जिंदाल तिची भेट घेतील असं सांगितलं. यानंतर जेमिमा शूटसाठी व चाहत्यांची भेट घेण्यासाठी तयार झाली.
यानंतर ती कॉन्फरन्स रूममध्ये जाऊन बसताच एक व्हीडिओ सुरू करण्यात आला. जिथे तिचं संपू्र्ण कुटुंबीय दिल्ली संघाची जर्सी घालून तिचं कौतुक करत होतं. तिच्या आईबाबांनी ती सर्वांचा अभिमान असल्याचं म्हणाले, तर भावानेही तिचं कौतुक केलं. यानंतर पार्थ जिंदाल एक ब्रीफकेस घेऊन आले, ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाची खास जर्सी होती. त्यावर जेमिमा रॉड्रीग्जच्या नावापुढे कर्णधार लिहिलेलं होतं. जेमिमा हे पाहताच खूप खुश झाली.
दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने २०२६ च्या महिला प्रीमियर लीग हंगामासाठी भारतीय स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. २५ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्ज ही लीगच्या पहिल्या हंगामापासून दिल्ली कॅपिटल्सची प्रमुख खेळाडू आहे आणि लिलावात ती त्यांची पहिली पसंती होती. अलिकडच्या आयसीसी महिला विश्वचषकात भारताच्या ऐतिहासिक विजयात तिने महत्त्वाची भूमिका बजावली. तिने मोठ्या व्यासपीठावर दबाव हाताळण्याची क्षमता सिद्ध केली आहे, म्हणूनच ती आता पहिल्यांदाच लीगमध्ये संघाचं नेतृत्व करणार आहे.
जेमिमा रॉड्रिग्जने दिल्ली कॅपिटल्ससाठी २७ WPL सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने १३९.६७ च्या स्ट्राईक रेटने ५०७ धावा केल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे, ती तिन्ही हंगामात संघासह अंतिम फेरीत सहभागी झाली आहे. ती केवळ फलंदाजीनेच नव्हे तर मैदानातही संघासाठी एक मॅचविनर खेळाडू असल्याचं तिने अनेकदा दाखवून दिलं आहे.
जेमिमा तिच्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना म्हणाली, “दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार म्हणून नियुक्त होणं हा सन्मान आहे आणि या संघाचे नेतृत्व करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी मालक आणि सपोर्ट स्टाफची खूप आभारी आहे.”
