Jemimah Rodrigues To Miss Remaining Matches Of WBBL 2025: गेल्या काही महिन्यात भारतीय महिला संघातील फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जच्या आयुष्यात अनेक चढउतार आले आहेत. ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या वर्ल्डकप सेमीफायनल सामन्यात तिने दमदार शतकी खेळी केली होती. भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून पहिल्यांदाच जेतेपदाचा मान पटकावला. त्यानंतर जेमिमा आणि भारतीय संघातील इतर खेळाडू स्मृती मानधानाच्या लग्नासाठी सांगलीत गेले होते. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह होणार होता. पण स्मृतीच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्याने हा विवाह अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान स्मृतीच्या कठीण काळात तिला पाठींबा देण्यासाठी जेमिमा रॉड्रिग्जने मोठा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियात सध्या वुमन्स बिग बॅश लीग २०२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. जेमिमा रॉड्रिग्ज या स्पर्धेत ब्रिसबेन हिट संघाचा भाग आहे. महिला वर्ल्डकप स्पर्धा झाल्यानंतर ती ही स्पर्धा खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेली होती. पण स्मृती मानधनाच्या लग्नासाठी ती भारतात परतली होती. पण स्मृतीसोबत जे काही घडलं, त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी आणि तिला सपोर्ट करण्यासाठी तिने ऑस्ट्रेलियाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ती ब्रिसबेन हिट संघाचे शेवटचे ४ सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार नाही.

जेमिमा रॉड्रिग्जने ब्रिसबेन हिट संघाला, तिला स्पर्धेतून रिलीज करण्यात यावं अशी विनंती केली होती. ब्रिसबेन हिट संघाच्या संघ व्यावस्थापकांनी या विनंतीला मान देऊन तिला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिसबेन हिट संघाचे सीईओ टेरी सेवेन्सन म्हणाले की, “जेमिमासाठी हा कठीण काळ आहे. ती वुमन्स बिग बॅश लीग स्पर्धेतील शेवटच्या ४ सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, हे निराशाजनक आहे. पण तिला भारतात थांबायचं आहे आणि आम्ही तिच्या या निर्णयाचा आदर करतो. ब्रिसबेन हिट जेमिमा आणि मानधना कुटुंबासोबत आहे.”

वर्ल्डकप २०२५ स्पर्धा सुरू असतानाच स्मृती मानधना आणि गायक पलाश मुच्छल यांचा विवाह होणार अशी चर्चा रंगली होती. हा विवाहसोहळा २३ नोव्हेंबरला सांगलीत होणार होता. पण लग्नाच्या काही तासांआधीच स्मृतीच्या वडिलांची अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांना तत्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. त्यानंतर पलाश मुच्छलची देखील तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्याला देखील रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. आता स्मृतीच्या वडिलांच्या तब्येतीत सुधारणा झाली असल्याचं म्हटलं जात आहे.