Jemimah Rodrigues On Defeat: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दुसऱ्यांदा तर दिल्ली कॅपिटल्सने सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. पण यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघाला रिकाम्या हाती परतावं लागलं आहे. संघाचा कर्णधार बदलला पण नशीब काही बदललं नाही. अंतिम फेरीत आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या उभारूनही दिल्ली कॅपिटल्सला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान सामन्यानंतर संघाची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जने खेळाडूंचं तोंडभरून कौतुक केलं.

सामन्यानंतर बोलताना जेमिमा रॉड्रिग्ज म्हणाली, “मला माझ्या संघाचा अभिमान आहे. आमच्यासाठी हे मुळीच सोपं नव्हतं. पण आमच्या मुलींनी जो खेळ केला आणि अंतिम फेरीत स्थान मिळवलं, हे अभिमानास्पद आहे. इतकंच नव्हे, तर सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी वातावरण चांगलं ठेवण्यात मोलाचं योगदान दिलं. तुम्ही पाहू शकता की, दिल्ली कॅपिटल्स संघाचे चाहते अजूनही जल्लोष करत आहेत. जगभरातील सर्व दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांचे मी आभार मानते.”

तसेच ती पुढे म्हणाली, “अंतिम सामन्यात २०४ हा कधीही उत्तम स्कोअर असतो. आम्ही एक संघ म्हणून जसा खेळ केला, त्यासाठी सर्वांचे आभार. मला तरी हेच वाटतं की, एक संघ म्हणून आम्ही उत्तम कामगिरी केली. आम्ही आणखी चांगलं करू शकलो असतो. पण सर्वांनी कठोर मेहनत घेतली.”

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने २०३ धावांचा डोंगर उभारला. दिल्ली कॅपिटल्सकडून सलामीला आलेल्या लिजेल ली ने ३७ धावा केल्या. तर शफाली वर्मा २० धावा करून माघारी परतली. अनुभवी फलंदाज लॉरा वोल्वार्ड्टने ४४ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जने ५७ आणि शिनेल हेनरीने नाबाद ३५ धावा केल्या. २०४ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. सलामीवीर ग्रेस हॅरिस स्वस्तात माघारी परतली. त्यानंतर स्मृती मानधना आणि जॉर्जिया वोलने दमदार खेळी करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.