फुटबॉल विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. टेनेरिफ संघाचा स्ट्राईकर डी मिगुएलचं वयाच्या ३० व्या वर्षी निधन झालं आहे. स्पेनच्या सेकंड डिव्हिजनच्या एका सामन्यात टेनेरिफ आणि एफसी अंडोरा हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. यादरम्यान टेनेरिफ संघाचा स्ट्राईकर डी मिगुएल आणि एफसी अंडोरा संघाचा गोलकीपर यांच्यात जोरदार धडक झाली. यादरम्यान डी मिगुएल हा गंभीर दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.

टेनेरिफ क्लबकडून मंगळवारी मिगुएलच्या मृत्यूबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे . त्यांनी आपल्या प्रेस रिलीझमध्ये लिहिले की, “आम्हाला सांगताना खूप वाईट वाटतंय की, ३ नोव्हेंबर २०२६ मंगळवारी सकाळी ८ वाजता जीसस डी मिगुएल अलामेडा यांचे निधन झाले आहे. कोणतेही शब्द हे दु:ख कमी करू शकणार नाहीत. आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या, जवळच्या मित्रांच्या आणि टेनेरिफच्या चाहत्यांच्या दु:खात सहभागी आहोत.”

सोमवारी झालेल्या सामन्यादरम्यान एफसी अंडोरा संघाचा गोलकीपर जीझस ओवोनोसोबत झालेल्या धडकेत मिगुएल जोरात खाली कोसळला. ज्यावेळी ही धडक झाली, त्यावेळी २-२ ने बरोबरीत होता. स्टॉपेज टाईमच्या सातव्या मिनिटाला हा सामना थांबवण्यात आला. मैदानावर उपचार घेतल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु रात्रभरात त्याची प्रकृती खालावली.

नेमकं काय घडलं?

ज्यावेळी मिगुएल शेवटच्या क्षणी विजय मिळवण्यासाठी प्रतिहल्ला करत वेगाने पुढे जात होता, त्यावेळी ही घटना घडली. मिगुएल गोल करण्यासाठी चेंडू पुढे घेऊन जात होता. त्यावेळी गोलकीपर ओवोन त्याच्याकडून चेंडू हिसकावून घेण्यासाठी आपल्या क्षेत्रातून बाहेर थेट मध्यरेषेपर्यंत आला. यादरम्यान चेंडू अडवण्यासाठी त्याने ऊंच ऊडी मारली, पण त्याचा गुडघा मिगुएलच्या छातीवर लागला. त्यामुळे मिगुएल जागेवरच कोसळला. मिगुएल मैदानावरच बेशुद्ध पडून होता. सुरूवातीला त्याच्यावर मैदानावरच उपचार करण्यात आले. त्यावेळी त्याचे सहकारी खेळाडू मैदानावरच रडू लागले. स्पॅनिश मीडियानुसार, रुग्णालयात नेत असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला.