Jharkhand vs Haryana SMAT 2025 Final: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना हरियाणा आणि झारखंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. इशान किशनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या झारखंड संघाने अंतिम सामन्यात हरियाणाला पराभूत करून पहिल्यांदाच या स्पर्धेच्या जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याचा मान पटकावला आहे. इशान किशनच्या स्फोटक शतकी खेळीच्या बळावर झारखंड संघाने पहिल्या डावात २६२ धावांची विक्रमी धावसंख्या उभारली होती. या धावांचा पाठलाग करताना हरियाणाच्या फलंदाजांनीही कडवी झुंज दिली. पण हरियाणाचा डाव १८.३ षटकात १९३ धावांवर आटोपला.
हरियाणाचा संघ पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. तर झारखंड संघाला देखील पहिल्यांदाच जेतेपदाची ट्रॉफी जिंकण्याची संधी होती. झारखंडच्या फलंदाजांनी या संधीचा दोन्ही हातांनी स्वीकार केला. पहिल्या डावात फलंदाजी करताना झारखंडच्या फलंदाजांनी हरियाणाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. अंतिम सामन्यात शतक झळकावणाऱ्या कर्णधार इशान किशनने या स्पर्धेत ५१७ धावा केल्या.
यासह झारखंड संघाने पहिल्यांदाच या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. हे या स्पर्धेचे १८ वे हंगाम आहे. तामिळनाडू संघाने सर्वाधिक ३ वेळेस या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर मुंबई, कर्नाटक, वडोदरा, गुजरात या संघांनी २ वेळेस या स्पर्धेच्या जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. तर ईस्ट झोन, महाराष्ट्र, बंगाल, पंजाब, दिल्ली आणि झारखंड या संघांनी एक एक वेळेस या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे.
या सामन्यात हरियाणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या झारखंडने २० षटकांअखेर ३ गडी बाद २६२ धावांचा डोंगर उभारला. झारखंडकडून खेळताना कर्णधार इशान किशनने ६ चौकार आणि १० षटकारांचा साहाय्याने ४९ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. तर कुमार कुशाग्रने ३८ चेंडूत ८१ धावांची तुफानी खेळी केली. शेवटी अनुकूल रॉयने नाबाद ४० आणि रॉबिन मिंझने नाबाद ३१ धावांची खेळी केली.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हरियाणाला चांगली सुरुवात मिळाली होती. यशवर्धन दलालने ५३ धावा केल्या. तर सामंत जाखरने ३८ धावा केल्या. पण हरियाणाचा डाव १९३ धावांवर आटोपला.
