भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने तडाखेबाज ७० धावा करूनही त्याच्या झारखंड संघाला विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला. दिल्ली संघाने त्यांना ९९ धावांनी पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली.
दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सर्वबाद २२५ धावा केल्या. त्यामध्ये नितीश राणा (४४) व पवन नेगी (३८) यांचा वाटा होता. झारखंडकडून राहुल शुक्ला याने सर्वाधिक तीन बळी घेतले. झारखंडला २२६ धावांचे आव्हान पेलले नाही. धोनीने केलेल्या शैलीदार ७० धावांचा अपवाद वगळता त्यांचा एकही फलंदाज चमक दाखवू शकला नाही. दिल्लीच्या सुबोध भाटीने प्रभावी गोलंदाजी करीत चार बळी घेत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. दुसऱ्या लढतीत रॉबिन बिश्तच्या नाबाद शतकामुळेच हिमाचल प्रदेशला पंजाबविरुद्ध पाच विकेट्स व चार चेंडू राखून विजय मिळवता आला.