मुंबई : भारताची माजी दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामी आगामी महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पहिल्या पर्वामध्ये मुंबई इंडियन्स संघाची प्रेरक आणि गोलंदाजी प्रशिक्षक अशी दुहेरी भूमिका बजावणार आहे. तसेच इंग्लंड संघाची माजी कर्णधार शार्लेट एडवर्ड्सची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे भारताची माजी अष्टपैलू देविका पळशीकर फलंदाजी प्रशिक्षक असेल. तर, तृप्ती चंदगडकर भट्टाचार्य या व्यवस्थापक म्हणून काम पाहतील.
निवृत्तीनंतर झुलन बंगालच्या महिला संघाच्या प्रेरकाच्या भूमिकेत काम करत आहे. एडवर्ड्सची कारकीर्दही तब्बल दोन दशके राहिली आहे. तिच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद मिळवले होते. एडवर्ड्सने निवृत्तीनंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील संघांसोबत प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. ‘आयसीसी’च्या ‘हॉल ऑफ फेम’ध्येही तिचा समावेश आहे.
देविका २०१४ ते २०१६ दरम्यान भारतीय महिला संघाची साहाय्यक प्रशिक्षक होती. तर, बांगलादेशच्या महिला संघाचीही ती साहाय्यक प्रशिक्षक राहिली आहे. तिच्या कार्यकाळात बांगलादेशने २०१८ मध्ये आशिया चषक जिंकला. मुंबई इंडियन्स ‘आयपीएल’मधील सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी ‘डब्ल्यूपीएल’साठी मुंबईचा संघ ९१२.९९ कोटी रुपयांत खरेदी केला.