नवी दिल्ली : भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी आगामी इंग्लंड दौऱ्यातील २४ सप्टेंबरला होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याची शक्यता आहे. हा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे.

झुलनची महिला क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणना केली जाते. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून झुलनच्या नावे सर्वाधिक ३५२ बळी आहेत. ३९ वर्षीय झुलनला जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. त्यातच भारतीय संघ व्यवस्थापनाचा युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी देण्याचा प्रयत्न असल्याने झुलनच्या भवितव्याबाबत प्रश्न निर्माण झाले होते. परंतु इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र, ही तिची अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका ठरू शकेल.

झुलनने यावर्षी मार्चमध्ये न्यूझीलंड येथे झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताकडून अखेरचा सामना खेळला होता. आता ‘बीसीसीआय’ तिला सन्मानजनक निरोप देण्याच्या विचारात आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे तिला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात पुनरागमनाची संधी मिळाली. झुलनने २०१८ नंतर एकही ट्वेन्टी-२० सामना खेळलेला नाही, तर तिने अखेरचा कसोटी सामना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खेळला होता.