भारताच्या जिस्ना मॅथ्युज हिने चारशे मीटर धावण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदक मिळविले आणि आशियाई युवा मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली.  भारताची ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू पी.टी.उषा यांच्या अकादमीत सराव करणाऱ्या जिस्नाने ४०० मीटरचे अंतर ५३.८४ सेकंदांत पार केले व राष्ट्रीय विक्रम नोंदविला. बहारिनच्या सेल्वा ईदनसीर हिने हे अंतर ५३.०२ सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले. मलेशियाच्या शेरीन सॅमसन वल्लाबॉय हिला कांस्यपदक मिळाले. तिने हे अंतर ५५.१४ सेकंदांत पार केले.  
मुलांच्या हातोडाफेकीत आशिष जाखर (७१.९७ मीटर) व मिराजा अली (६४.९१ मीटर) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकाविले.
भारताने आतापर्यंत या स्पर्धेत दोन सुवर्ण, पाच रौप्य व पाच कांस्य अशी एकूण एक डझन पदके जिंकली आहेत.
भालाफेकीत भारताच्या महंमद हादिश (७५.५२ मीटर) व अभिषेक द्रालकुमार (७४.७२ मीटर) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले. तिहेरीउडीत सोनुकुमार (१५.०८ मीटर) याला कांस्यपदक मिळाले.