Jitesh Sharma Statement: आयपीएल २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या हंगामातील कामगिरी पाहता, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पहिल्या सामन्यापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चॅम्पियनसारखा खेळ केला. शेवटी गुजरात टायटन्सला पराभूत करुन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान पटकावला आहे. दरम्यान या विजयानंतर जितेश शर्मा काय म्हणाला? जाणून घ्या.
या विजयानंतर हर्षा भोगले आणि जितेश शर्मा हे मराठीत संवाद साधताना दिसून आले. त्यावेळी जितेश शर्मा म्हणाला की, “मस्त वाटतंय, आनंद होतोय आणि इथे आयपीएलमध्ये मराठीत बोलतोय याचा जास्त आनंद होतोय. मो मोबाट आधीच म्हणाला होता, आम्ही जेतेपदाचा बचाव करत नाही आहोत, तर आम्ही नवीन जेतेपदाचा पाठलाग करत आहोत. तिथेच आमची मानसिकता पूर्णपणे बदलली. या यशाचे संपूर्ण श्रेय आमच्या टीम मॅनेजमेंटला जाते. त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला सतत पुढे जाण्यासाठी जे प्रोत्साहन दिलेते खरोखर कौतुकास्पद आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “या प्रवासात डीके( दिनेश कार्तिक) आणि मो या दोघांनीही मला खूप मदत केली. त्यांनी आम्हाला खूप चांगल्याप्रकारे मार्गदर्शन केलं. आमचा संघ खूप मजबूत संघ आहे, याची आम्हाला आधीपासूनच जाणीव होती. त्यामुळे आम्ही एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित केलं. आम्ही किती चांगली कामगिरी करतोय, याऐवजी आमचे संपूर्ण लक्ष आमच्या रणनीतीवर होते. पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच तिसरे जेतेपद पटकावू.”
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सला २० षटकांअखेर १५५ धावा करत आल्या. गुजरातकडून फलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ५० धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून विराट कोहलीने नाबाद ७५ धावांची खेळी केली होती. शेवटच्या चेंडूवर विराटने षटकार मारुन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजय मिळवून दिला.
