टी२० वर्ल्डकप स्पर्धेत सोमवारी इटलीचं पदार्पण झालं. कोलकाता इथल्या इडन गार्डन्स मैदानावर इटली विरुद्ध स्कॉटलंड मुकाबला सुरू आहे. या लढतीत इटलीकडून जे जे स्मूट्स खेळत आहे. स्मूट्स इटलीचं प्रतिनिधित्व करत असला तरी प्रत्यक्षात तो कधीही इटलीला गेलादेखील नाहीये.

जे जे स्मूट्सचा जन्म दक्षिण आफ्रिकेचा. तिथेच तो क्रिकेट शिकला. वयोगट स्पर्धा, डोमेस्टिक संघ हे टप्पे पार करत त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी खेळण्याचा मान मिळवला. २०१७ मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी टी२० पदार्पण केलं. तीन वर्षांनी त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी वनडे पदार्पण केलं. तडाखेबंद फटकेबाजी करणारा सलामीवीर आणि डावखुरा फिरकीपटू अशी त्याची ओळख आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळालं तरी तो तिथे स्थिरावू शकला नाही. तो संधीच्या प्रतीक्षेत होता. त्यावेळी इटलीच्या संघाकडून खेळण्याची शक्यता निर्माण झाली. लग्नाच्या माध्यमातून तो इटलीसाठी खेळण्याकरता पात्र ठरला. ३८वर्षीय स्मूट्स इटलीत गेलादेखील नाहीये पण आता तो इटलीचं प्रतिनिधित्व करत आहे.

इटलीचे खेळाडू अतिशय उत्साही आहेत. आयर्लंडला नमवल्यानंतर आम्ही तो विजय साजरा केला होता. मी वर्ल्डकप खेळेन असं मला कधीही वाटलं नाही. मी दक्षिण आफ्रिकेसाठी फार आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलो नाही. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी काय गोष्टी आवश्यक असतात ते समजलं. दक्षिण आफ्रिकेसाठी खेळलो तो अनुभव इटलीकडून खेळताना कामी आला. दक्षिण आफ्रिका संघात स्थान मिळावं यासाठी अनेक प्रतिभावना खेळाडूंमध्ये चुरस असते. स्पर्धा प्रचंड असल्याने संधी मिळते तेव्हा सर्वोत्तम कामगिरी करणं आवश्यक असतं. अन्यथा तुमची जागा अन्य कुणीतरी घेऊ शकतं.

स्मूट्सने २०१७ ते २०२१ या कालावधीत ६ वनडे आणि १६ टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं. टाईप १ डायबेटिसचा सामना करत स्मूट्सने क्रिकेट खेळण्याचं आव्हान पेललं आहे.