Joanne Hicks creates history with 5 wicket haul: ज्या वयात क्रिकेटपटू आपली क्रिकेट कारकिर्द संपवून आयुष्यातील दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करतात, त्याच वयात जोआन हिक्स या महिला क्रिकेटपटूने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं . जोआन हिक्स यांना वयाच्या ४७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. पदार्पण केल्याच्या अवघ्या ४ वर्षांनंतर म्हणजेच, वयाच्या ५१ व्या वर्षी जोआन हिक्स यांनी ९६ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. आईल ऑफ मॅनच्या या ५१ वर्षांच्या गोलंदाजाने गोलंदाजी करताना ५ गडी बाद केले आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ गडी बाद करणाऱ्या सर्वात वयस्कर गोलंदाजाचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
या अनुभवी फिरकी गोलंदाजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ गडी बाद करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील तिने ३ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. आता ग्रीसविरुद्ध खेळताना जोआन हिक्स यांनी अवघ्या १० धावा खर्च करुन ५ गडी बाद केले. ही त्यांच्या टी-२० कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. या दमदार कामगिरीच्या बळावर ग्रीसचा डाव १५ षटकात अवघ्या ५२ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या आईल ऑफ मॅन संघाने दिलेलं आव्हान ९ गडी राखून पूर्ण केलं आणि एकतर्फी विजयाची नोंद केली.
गोलंदाजीत केलेल्या या दमदार कामगिरीच्या बळावर जोआन हिक्सने ९० वर्षांपूर्वीचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. जोआन हिक्स या पुरुषांच्या आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयाची पन्नाशी ओलाडल्यानंतर ५ गडी बाद करणारे पहिलेच गोलंदाज ठरले आहेत. जोआन हिक्स या सध्या ५१ वर्षांच्या आहेत. याआधी हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या बर्ट आयरनमोंगर यांच्या नावे होता. बर्ट यांनी ९६ वर्षांपूर्वी आपल्या नावावर केला होता.
याआधी १९३२ मध्ये आयरनमोंगर यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात वयाच्या ५२ व्या वर्षी गोलंदाजी करताना ५ गडी बाद केले होते. त्यावेळी ते सर्वात वयस्कर गोलंदाज ठरले होते. तेव्हापासून हा रेकॉर्ड कोणालाच मोडता आला नव्हता. अखेर २०२६ मध्ये जोआन हिक्स यांनी हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. आयरनमोंगर यांना १९३३ मध्ये १४ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यासह वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्यांनी सर्वाय वयस्कर खेळाडू म्हणून आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट केला.
