Brydon Carse Nightclub Controversy Joe Root Reaction: इंग्लंड क्रिकेट संघातील खेळाडूंच्या नाईट क्लबमधील वादांना काही पूर्णविराम लागत नाहीये. एकामागून एक अनेक वाद समोर येत आहेत. संघाच्या कामगिरीपेक्षाही खेळाडूंचे नाईट क्लबमधील वाद अधिक चर्चेत आहेत. पाकिस्तानविरूद्ध पहिल्या कसोटीनंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सला नाईट क्लबबाहेर पोलिसांनी बेड्या घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर त्याला आता दुसऱ्या कसोटी संघातून वगळण्यात आलं आहे. यावर कर्णधार जो रूटने मोठी प्रतिक्रिया देत त्याने कार्सशी संवाद साधल्याचं देखील सांगितलं आहे.

इंग्लंडचा कर्णधार जो रूटने ब्रायडन कार्सच्या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. डर्बीमध्ये गेल्या शनिवारी नाईट क्लबबाहेर स्थानिक पोलिसांनी कार्सला बेड्या घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर २७ ऑगस्टपासून लॉर्ड्सवर सुरू होणाऱ्या इंग्लंड-पाकिस्तान दुसऱ्या कसोटीपूर्वी कार्सला संघातून वगळण्यात आलं. कार्स या वर्षात इंग्लंडच्या संघातून वगळला गेलेला तिसरा खेळाडू ठरला. यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान बेन स्टोक्स आणि गस अ‍ॅटकिन्सन यांच्यावर रात्रीच्या कर्फ्यूच उल्लंघन केल्याने आणि एका रग्बीपटूसोबत झालेल्या मारामारीत सहभागी झाल्याने कारवाई करण्यात आली होती.

ब्रायडन कार्सच्या प्रकरणावर बोलताना रूट म्हणाला, “खरं सांगायचं तर मला या घटनेचा खूप राग आला आहे. मी खरोखरच निराश आहे. गेल्या आठवड्यातील कामगिरीनंतर आपण इथे बसलो आहोत आणि आता पूर्णपणे वेगळ्या विषयावर चर्चा करत आहोत. या घटनेबाबत नियामक संस्था तपास करत असल्याने मी यावर फारसं काही बोलू शकत नाही. आता हे प्रकरण त्यांच्या हातात आहे.” लॉर्ड्सवर गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला रूटने पत्रकारांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली.

३१ वर्षीय ब्रायडन कार्स यंदाच्या अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने मालिकेत तब्बल २२ विकेट्स घेतल्या होत्या. पाकिस्तानविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची इंग्लंडच्या संघात निवड झाली होती. मात्र, मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नव्हतं. त्यानंतर काउंटी चॅम्पियनशिपमध्ये डरहॅमकडून खेळण्यासाठी कार्सला इंग्लंडच्या संघातून रिलीज करण्यात आलं. डर्बीशायरविरुद्धच्या सामन्यात त्याने २६ धावा केल्या आणि ८२ धावांत २ विकेट्स घेतल्या. डरहॅमने हा सामना अवघ्या तीन दिवसांत जिंकला.

शनिवारी रात्री कार्स आपल्या डरहॅम संघातील सहकारी बेन स्टोक्स आणि मॅथ्यू पॉट्ससह डर्बीमधील एका नाईट क्लबमध्ये गेला होता. त्यानंतर क्लबबाहेर स्थानिक पोलिसांनी कार्सला बेड्या घातल्याचं व्हिडिओमध्ये दिसून आलं. मात्र, स्थानिक पोलिसांनी नंतर त्याला सोडून दिलं. सोमवारी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) पाकिस्तानविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांसाठी कार्सला संघातून वगळण्याचा निर्णय जाहीर केला.

रूटने सांगितलं की, त्याने कार्ससह याबाबत चर्चा केली आहे. कार्सने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला असून, आपल्या कृतीची जाणीव असल्याचं त्याने रूटला सांगितलं. रूट म्हणाला, “मी ब्रायडनशी बोललो आहे. जेव्हा मला या घटनेबद्दल पहिल्यांदा कळलं, तेव्हा एक व्यक्ती म्हणून सर्वात आधी मला त्याची काळजी वाटली. तो असा खेळाडू आहे, ज्याच्यासोबत मी या ड्रेसिंग रूममध्ये बराच वेळ घालवला आहे. साहजिकच, खेळाडूंसह तुमचे वैयक्तिक संबंध निर्माण होतात आणि तो या घटनेमुळे खूप अस्वस्थ आहे, त्याने माफीही मागितली आहे आणि आपल्या कृतीची त्याला जाणीव आहे. मला खात्री आहे की संधी मिळाल्यावर तो स्वतःही याबद्दल बोलेल.”

रूट म्हणाला, “ही केवळ एक घटना नाही. आम्ही मैदानाबाहेर सतत अशा मूर्खासारख्या चुका करत राहतो आणि त्यामुळे मैदानावर आम्ही जे करण्याचा प्रयत्न करतोय, त्यापासून लक्ष विचलित होतं. हीच गोष्ट अधिक निराशाजनक आहे,” असं जो रूटने सांगितलं.