Joe Root Record In Test Cricket: अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याचा निकाल अवघ्या दुसऱ्याच दिवशी लागला आहे. मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटीचा थरार पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी १७५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने ४ गडी राखून दमदार विजयाची नोंद केली. यासह मालिकेत ३-१ ने पुनरागमन केलं. या सामन्यातील दोन्ही डावात जो रूटला हवी तशी खेळी करता आली नाही. पहिल्या डावात फलंदाजी करताना तो शून्यावर बाद झाला. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने १५ धावा केल्या. यादरम्यान त्याने असा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे, जो याआधी इंग्लंडच्या कुठल्याही फलंदाजाला करता आला नव्हता.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना १५ धावा पूर्ण करताच रूटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. असा रेकॉर्ड करणारा तो इंग्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. तर जगातील नववा फलंदाज ठरला आहे. या विक्रमाच्या यादीत विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस आणि राहुल द्रविडसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
रूटने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील ३८० व्या सामन्यातील ५०१ व्या डावात २२ हजार धावांचा पल्ला गाठला आहे. याआधी इंग्लंडच्या एकही फलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० हजार धावांचा पल्ला गाठता आलेला नाही. त्यामुळे जो रूटचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २२ हजार धावा करण्याच्या विक्रमात त्याने वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू ब्रायन लारा यांचा विक्रम मोडून काढला आहे. लारा यांनी ५११ व्या डावात २२ हजार धावांचा पल्ला गाठला होता.
हे आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २२ हजार धावांचा पल्ला गाठणारे फलंदाज
विराट कोहली- ४६२ डावात
सचिन तेंडुलकर- ४९३ डावात
जो रूट- ५०१ डावात
ब्रायन लारा- ५११ डावात
रिकी पाँटिंग- ५१४ डावात
इंग्लंडचा दमदार विजय
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १५२ धावांवर आटोपला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा पहिला डाव ११० धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव १३२ धावांवर आटोपला. यासह ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी १७५ धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान इंग्लंडने पूर्ण करून ४ गडी राखून विजय मिळवला.
