Joe Root Record: इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये तो सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. आता वनडे क्रिकेटमध्येही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे. त्यामुळे मालिकेतील तिसरा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना हॅरी ब्रूकने नाबाद १३७ धावांची खेळी केली. तर जो रूट देखील १११ धावांवर नाबाद राहिला. दरम्यान जो रूटच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

श्रीलंकेतील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय इंग्लंडच्या फलंदाजांनी सार्थ ठरवला. जो रूट आणि हॅरी ब्रूकच्या शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने पहिल्या डावात ३ गडी बाद ३५७ धावांचा भलामोठा डोंगर उभारला. यादरम्यान जो रूटने ५४ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या अर्धशतकी खेळीसह त्याने वनडे क्रिकेटमध्ये ७५०० धावांचा पल्ला गाठला आहे.

अशी कामगिरी करणारा ठरला चौथा फलंदाज

वनडे क्रिकेटमध्ये ७५०० धावांचा पल्ला गाठताच जो रूटच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. रूट हा वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ७५०० धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. रूटने १७८ वनडे डावात हा पल्ला गाठला आहे. तर या यादीत अव्वल स्थानी असलेल्या हाशिम आम्लाने सर्वात जलद १६० डावात ७५०० धावांचा पल्ला गाठला होता. या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या विराट कोहलीने १६७ डावात ७५०० धावांचा पल्ला गाठला होता. तर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने वनडे क्रिकेटमधील १७४ डावात फलंदाजी करताना ७५०० धावांचा पल्ला गाठला होता.

या विक्रमात त्याने भारताचे दिग्गज फलंदाज सौरव गांगुली आणि रोहित शर्मा यांना मागे टाकलं आहे. सौरव गांगुली यांनी आपल्या वनडे कारकिर्दीतील १८५ व्या डावात ७५०० धावांचा पल्ला गाठला होता. तर रोहित शर्माने १८८ व्या डावात ७५०० धावांचा पल्ला गाठला होता.