Joe Root Breaks Big Record Of Steve Smith: इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना बर्मिंघममध्ये सुरू आहे. या सामन्यावरही इंग्लंडचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. मालिकेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये इंग्लंडने एकतर्फी विजयाची नोंद केली होती. आता तिसरा सामना जिंकून इंग्लंडचा संघ पाकिस्तानवर ३-० ने विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या १३३ धावांवर आटोपल्यानंतर, इंग्लंडने ४५३ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर ५२ धावांवर पाकिस्तानचे २ फलंदाज तंबूत परतले आहेत. त्यामुळे इंग्लंडकडे अजूनही २६८ धावांची आघाडी आहे. यादरम्यान इंग्लंडचा कर्णधार जो रूटने ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू स्टीव्ह स्मिथचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव ४५३ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. या डावातही सॅम अयुब शून्यावर माघारी परतला. त्यानंतर पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर पाकिस्तानला दुसरा मोठा धक्का बसला. अब्दुल्ला शफीक स्लिपमध्ये जो रूटच्या हातून झेलबाद होऊन माघारी परतला. या झेलसह क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जो रूट अव्वल स्थानी पोहोचला आहे. या यादीत स्टीव्ह स्मिथ आणि जो रूट या दोघांमध्येही रस्सीखेच सुरू आहे.रूटने आतापर्यंत २२० झेल घेतले आहेत. तर स्टीव्ह स्मिथच्या नावे २१९ झेल घेण्याची नोंद आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल टिपणारे खेळाडू

जो रूट- २२० झेल (इंग्लंड)
स्टीव्ह स्मिथ – २१९ झेल (ऑस्ट्रेलिया)
राहुल द्रविड- २१० झेल (भारत)
महेला जयवर्धने- २०५ झेल ( श्रीलंका)
जॅक कॅलिस- २०० झेल (दक्षिण आफ्रिका)

जो रूटने आतापर्यंत या मालिकेत अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. पण संपूर्ण मालिकेत तो फलंदाजीत नावाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. मालिकेतील ३ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याला केवळ एकदाच अर्धशतकाचा टप्पा ओलांडता आला आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने ४५० धावांचा टप्पा ओलांडला, पण यामध्ये रूटचं योगदान केवळ ८ धावांचं होतं.आता दुसऱ्या डावात जर फलंदाजीची संधी मिळाली, तर त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.