England vs Pakistan 2nd Test: इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटने गेल्या काही वर्षांत अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. आता पाकिस्तानविरुद्ध खेळतानाही त्याने अनेक मोठे रेकॉर्ड मोडून काढले आहेत. आता त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंगचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. जो रूट हा कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. पण घरच्या मैदानावर खेळताना सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये तो तिसऱ्या स्थानी आहे.

अवघ्या ९ धावा करताच इतिहास घडवला

पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू आहे. या संपूर्ण मालिकेत जो रूटची बॅट शांत राहिली आहे. पण पाकिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीतील दुसऱ्या डावात अवघ्या ९ धावा करताच त्याने इतिहास घडवला आहे.

रिकी पाँटिंगने कसोटी क्रिकेटमधील ९२ कसोटी सामन्यांमध्ये फलंदाजी करताना ५६.९७ च्या सरासरीने ७५७८ धावा केल्या. पाकिस्तान विरुद्धचा सामन्यात अवघ्या ९ धावा करताच हा रेकॉर्ड मोडून काढला. आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात घरच्या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये तो अव्वल स्थानी पोहोचला आहे. जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना ८९ सामन्यांतील १५६ डावात फलंदाजी करताना ७५९४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २४ शतकं आणि ३५ अर्धशतकं झळकावली आहेत.

भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर सर्वाधिक शतकं आणि सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये अव्वल स्थानी आहे. पण घरच्या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये तो तिसऱ्या स्थानी आहे. सचिन तेंडुलकरने घरच्या मैदानावर फलंदाजी करताना ९४ सामन्यातील १५३ डावात ५२.६७ च्या सरासरीने ७२१६ धावा केल्या आहेत. सचिनने २२ शतकं आणि ३२ अर्धशतकं झळकावली आहेत.