इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने अॅशेस मालिकेतील सिडनी कसोटीत शतक झळकावत शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जो रूट तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. रूटने कसोटी प्रकारातलं ४१वं शतक झळकावत रिकी पॉन्टिंगच्या शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली.

रूटने ११ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ऑस्ट्रेलियातील शतकांचा दुष्काळ ब्रिस्बेन कसोटीत संपवला होता. ११ वर्षात ऑस्ट्रेलियात रूटच्या नावावर ९ अर्धशतकं होती. या दौऱ्यात रुटचं ऑस्ट्रेलियात शतक झळकावण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. ब्रिस्बेन कसोटीतला फॉर्म कायम राखत रूटने आणखी एक शतक पूर्ण केलं. रूटने १४६ चेंडूत शतक गाठलं. २०२१ पासून रुटचं हे २४वं शतक आहे. या कालावधीत सर्वाधिक शतकं रूटनेच झळकावली आहेत.

रिकी पॉन्टिंगने १६८ सामन्यात ५१.८६च्या सरासरीने १३३७८ धावा केल्या आहेत. यामध्ये ४१ शतकं आणि ६२ अर्धशतकांचा समावेश आहे. सर्वाधिक शतकांच्या यादीत सचिन तेंडुलकर ५१ शतकांसह अव्वल स्थानी आहे. जॅक कॅलिस ४५ शतकांसह दुसऱ्या तर पॉन्टिंग आणि रूट प्रत्येकी ४१ शतकांसह तिसऱ्या स्थानी आहेत. रूटला कसोटीत १४,००० धावांचा टप्पाही खुणावतो आहे.

रूटच्या शतकाच्या बळावर इंग्लंडने सिडनी कसोटीत ३८४ धावांची मजल मारली. हॅरी ब्रुकने ८४ धावांची खेळी करत रुटला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियातर्फे मायकेल नेसरने ४ विकेट्स पटकावल्या.