Joe Root First Test Century In Australia: इंग्लंडचा संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असतो, तेव्हा अनुभवी फलंदाज जो रूट खंबीरपणे उभा राहतो. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना ब्रिसबेनमध्ये सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला सुरूवातीलाच मोठे धक्के बसले होते. पण जो रूटने आपला अनुभव पणाला लावून एक बाजू धरून ठेवली. दरम्यान त्याने १८१ चेंडूंचा सामना करत ऑस्ट्रेलियात खेळताना पहिलं शतक झळकावलं आहे. यासह त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
जो रूट इंग्लंडच्या सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ४० वे शतक आहे. पण मुख्य बाब म्हणजे त्याला ऑस्ट्रेलियात खेळताना एकही शतकी खेळी करता आली नव्हती. गेल्या कित्येक वर्षांपासून तो ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेट खेळताना शतक झळकावण्याच्या प्रतिक्षेत होता. अखेर ब्रिसबेनच्या मैदानावर खेळताना त्याने ऑस्ट्रेलियात शतकांचं खातं उघडलं आहे. त्यामुळे हे शतक त्याच्यासाठी खूप खास आहे.
याआधी देखील जो रूट ऑस्ट्रेलियात शतक झळकावण्याच्या जवळ पोहोचला आहे.पण त्याला शतक पूर्ण करता आलं नव्हतं. २०२१-२२ मध्ये झालेल्या ब्रिसबेन कसोटीत तो ८९ धावांवर माघारी परतला होता. त्याआधी २०१३-१४ मध्ये झालेल्या अॅडिलेड कसोटीत तो ८७ धावांवर माघारी परतला होता. तर २०१७-१८ मध्ये झालेल्या सिडनी कसोटीत तो ८३ धावांवर माघारी परतला होता. जो रूटला ऑस्ट्रेलियात शतक झळकावण्यासाठी १२ वर्ष आणि ३० डाव वाट पाहावी लागली आहे.
मोठ्या विक्रमात कुमार संगकाराला टाकलं मागे
या शतकी खेळीसह जो रूटने मोठ्या विक्रमात श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकाराला मागे टाकलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रूट चौथ्या स्थानी पोहोचला आहे. याआधी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत जो रूट आणि कुमार संगकारा दोघेही ३९-३९ शतकांसह संयुक्तरित्या चौथ्या स्थानी होते. आता रूटने कुमार संगकाराला मागे टाकलं आहे. आणखी १ शतक झळकावताच त्याच्याकडे रिकी पाँटींगच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी असणार आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. सचिनने ५१ शतकं झळकावली आहे. तर ४५ शतकांसह जॅक कॅलिस या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तिसऱ्या स्थानी असलेल्या रिकी पाँटींगच्या नावे ४१ शतकं झळकावण्याची नोंद आहे.
