इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात ८ जुलैपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेआधी इंग्लंडचा कर्णधार जो रुटने पहिल्या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्मावेळी पत्नीसोबत असण्यासाठी जो रुटने इंग्लंड बोर्डाकडून विशेष सुट्टी घेतली आहे. रुटच्या जागेवर बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करेल. ८ जुलैपासून वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात साऊदम्पटन येथे पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

जो रुटने पहिल्या कसोटीसाठी स्टोक्सला शुभेच्छा दिल्या असून, त्याच्यात नेतृत्वगुण आहेत, त्यामुळे तो इंग्लंडच्या संघाचं चांगलं नेतृत्व करेल असं रुटने बीबीसीशी बोलताना सांगितलं. ८ जुलैदरम्यान रुटच्या पत्नीला बाळ होणार आहे, यासाठी रुटने सुट्टी घेण्याचं ठरवलंय. इंग्लंडच्या खेळाडूंना संघात सहभागी होण्याआधी ७ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करणं बंधनकारक करण्यात आलंय. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात रुट सहभागी होईल का याबद्दलही साशंकता आहे.