Joe Root Breaks Sachin Tendulkar Record: आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू असताना श्रीलंका आणि इंग्लंड क्रिकेट संघांमध्ये एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात जो रूटने ४४ धावांची खेळी करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. रूटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. यादरम्यान त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे.

इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने ४४ धावांची खेळी करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ हजार धावांचा टप्पा गाठला. हा टप्पा गाठताना त्याने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडीत काढला आणि सर्वात कमी डावांमध्ये २३ हजार धावा करणारा फलंदाज ठरला. याव्यतिरिक्त, एकूण धावांच्या बाबतीत रूटने ब्रायन लारालाही मागे टाकलं.

जो रूटने ५२१ डावांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ हजार धावांचा टप्पा गाठला आणि सचिन तेंडुलकरला मागे टाकलं, ज्याने ही कामगिरी ५२२ डावांत केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत २३ हजार धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत रूट आता दुसऱ्या स्थानावर आला आहे, तर तेंडुलकर तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. सर्वात कमी डावांत २३ हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान अशा खेळाडूच्या नावावर आहे ज्याने ही कामगिरी ४९० डावांत पूर्ण केली होती आणि तो खेळाडू म्हणजे भारताचा रन मशीन विराट कोहली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत २३ हजार धावा पूर्ण करणारे ८ फलंदाज

४९० डाव – विराट कोहली
५२१ डाव ​​– जो रूट
५२२ डाव – सचिन तेंडुलकर
५४४ डाव – रिकी पाँटिंग
५५१ डाव ​​– जॅक कॅलिस
५६८ डाव – कुमार संगकारा
५७६ डाव – राहुल द्रविड
६४५ डाव – महेला जयवर्धने

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत जो रूटने ब्रायन लाराला मागे टाकून आठवं स्थान पटकावलं आहे, तर लारा नवव्या स्थानावर घसरला आहे. रूटने आतापर्यंत ३९४ सामन्यांत २३,०४१ धावा केल्या आहेत, तर लाराने २२,३५८ धावा केल्या होत्या. ३४,३५७ धावांसह सचिन तेंडुलकर या यादीत अव्वल स्थानावर आहे, तर २८,३५९ धावांसह विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप दहा खेळाडू

३४,३५७ धावा – सचिन तेंडुलकर
२८,३५९ धावा – विराट कोहली
२८,०१६ धावा – कुमार संगकारा
२७,४८३ धावा – रिकी पाँटिंग
२५,९५७ धावा – महेला जयवर्धने
२५,५३४ धावा – जॅक कॅलिस
२४,२०८ धावा – राहुल द्रविड
२३,०४१ धावा – जो रूट
२२,३५८ धावा – ब्रायन लारा
२१,०३२ धावा – सनथ जयसूर्या