लंडन : आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडच्या प्राथमिक संघाची घोषणा करण्यात आली असून जायबंदी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या चौथ्या ॲशेस कसोटीत सात बळी मिळवणाऱ्या वेगवान गोलंदाज जोश टंगलाही प्रथमच ट्वेन्टी-२० संघात संधी देण्यात आली आहे.
ॲशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान आर्चरला कंबरेची दुखापत झाली. त्यामुळे त्याला चौथ्या कसोटीला मुकावे लागले आणि तो पाचव्या कसोटीसाठीही उपलब्ध नसेल. तसेच तो श्रीलंकेविरुद्ध २२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या प्रत्येकी तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकांनाही मुकणार आहे. मात्र, भारत आणि श्रीलंकेत फेब्रुवारी-मार्चमध्ये रंगणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी तो तंदुरुस्त होणे अपेक्षित आहे.
हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखालील इंग्लंडची सलामीची लढत ८ फेब्रुवारीला नेपाळविरुद्ध मुंबई येथे होणार आहे. त्यानंतर ते अनुक्रमे वेस्ट इंडिज (११ फेब्रुवारी), बांगलादेश (१४ फेब्रुवारी) आणि इटली (१६ फेब्रुवारी) या संघांविरुद्ध साखळी सामने खेळतील. जेमी स्मिथ, जॉर्डन कॉक्स आणि साकिब महमूद यांना ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठीच्या प्राथमिक संघातून वगळण्यात आले आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि श्रीलंकेविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिकेच्या संघांत केवळ एक बदल असेल. आर्चर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध नसल्याने त्याची जागा ब्रायडन कार्स घेईल.
ॲशेस मालिकेतील पहिल्या तीनही सामन्यांत इंग्लंडला हार पत्करावी लागली. मात्र, ३० वर्षीय आर्चरने चांगली कामगिरी केली. त्याने सहा डावांत मिळून नऊ गडी बाद केले. तसेच फलंदाजीत एक अर्धशतकही साकारले. त्यामुळे आता त्याच्या तंदुरुस्तीबाबत इंग्लंडचे संघ व्यवस्थापन आशावादी आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघ : हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर, बेन डकेट, फिल सॉल्ट, जेकब बेथल, विल जॅक्स, टॉम बँटन, जोफ्रा आर्चर, सॅम करन, लियाम डॉसन, रेहान अहमद, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, जोश टंग, ल्यूक वूड.
