John Abraham reveals special cricket connection with Rohit Sharma Video: बॉलीवूड आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रांचं खास कनेक्शन राहिलं आहे. अनेक क्रिकेटपटू आणि बॉलीवूड कलाकार यांच्यातील मैत्री, प्रेमसंबंध आणि विवाहामुळे हे कनेक्शन आणखी घट्ट झालं आहे. विराट कोहली–अनुष्का शर्मा, हरभजन सिंग–गीता बसरा यांसारख्या जोड्यांनी चाहत्यांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली. चित्रपटांच्या प्रमोशनपासून ते आयपीएल सामन्यांपर्यंत दोन्ही क्षेत्रांतील सेलिब्रिटी एकमेकांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसतात. तर चित्रपटांसाठी अनेक खेळाडू क्रिकेटच ट्रेनिंग घेतात. यादरम्यान जॉन अब्राहमचा एक व्हीडिओ सध्या चर्चेत आहे.
टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि बॉलीवूड स्टार जॉन अब्राहम यांच्यात खास कनेक्शन आहे. रोहित शर्माचे बालपणीचे क्रिकेट कोच दिनेश लाड हे जॉन अब्राहमचे कोच पण असल्याचं त्याने स्वत: एका व्हीडिओमध्ये सांगितलं आहे. जॉन अब्राहम नुकताच एका व्हीडिओमध्ये रोहितचे कोच दिनेश लाड यांच्याबरोबर दिसला. यात तो म्हणालाय की रोहितचे कोच माझे ही कोच आहेत.
युरोपियन टी-२० प्रीमियर लीगच्या (ETPL) पहिल्या हंगामापूर्वी मुंबईत रॉटरडॅम डॉकर्स संघाच्या जर्सी लॉन्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात एक रंजक खुलासा समोर आला. जॉन अब्राहम हा या संघाचा सह-मालक असून त्याच्यासोबत जॉन्टी रोड्स, फाफ डू प्लेसिस आणि हेन्रिक क्लासेन हेही संघाचे सह-मालक आहेत.
रोहित शर्मा-जॉन अब्राहममध्ये काय आहे खास कनेक्शन?
या कार्यक्रमाला प्रशिक्षक दिनेश लाड उपस्थित होते. त्यांनी जॉन अब्राहमसोबत फोटो काढण्यासाठी पोझ दिली. पापाराझींशी संवाद साधताना जॉन अब्राहम म्हणाला, “हे रोहित शर्माचे कोच आहेत. ते माझेही कोच होते. ही माझ्याकडून त्यांना गुरुदक्षिणा आहे.”
कार्यक्रमात बोलताना अब्राहमने सांगितलं की, तरुणपणी त्याने चार महिने दिनेश लाड यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं होतं. यावेळी त्याने मिश्कीलपणे असंही म्हटलं की, प्रशिक्षक दिनेश लाड यांना त्याचा कव्हर ड्राइव्ह पाहायला खूप आवडायचा. तर लोकसत्ताशी संवाद साधताना दिनेश लाड म्हणाले की, २०१२ मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी जॉनने त्यांच्याकडून क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलं होतं.
जॉन अब्राहम कार्यक्रमात बोलताना सांगितलं, “लोक मला फक्त एक अभिनेता म्हणून पाहतात. पण माझे फलंदाजी प्रशिक्षक इथे उपस्थित आहेत, लाड सर. त्यांनी मला प्रशिक्षण दिलं आहे आणि त्यांनी रोहित शर्मालाही घडवलं आहे. माझा कव्हर ड्राइव्ह पाहायला त्यांना खूप आनंद मिळायचा.”
दरम्यान, २०२६ मध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत निवृत्तीच्या चर्चांदरम्यान रोहित शर्माने दमदार पुनरागमन करत लॉर्ड्सच्या मैदानावर शतक झळकावलं. गेल्या महिन्यात भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत रोहित अखेरचा मैदानात दिसला होता. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत त्याने अनुक्रमे ११ आणि २६ धावा केल्याने त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. मात्र, टीका आणि निवृत्तीच्या अफवांना उत्तर देताना रोहितने शतकी खेळी साकारत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली.
