नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीकडून सध्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा दैनंदिन कारभार पाहिला जात आहे. ‘फिफा’ आणि आशियाई फुटबॉल महासंघाचे (एएफसी) संयुक्त शिष्टमंडळ संघटनात्मक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भारतात येणार आहे.

‘फिफा’ आणि ‘एएफसी’ शिष्टमंडळाचा भारत दौरा जूनमध्ये असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फुटबॉल संघटनेची सद्य:स्थिती समजून घेणे, हा मुख्य उद्देश आहे. ‘‘सरकारी किंवा न्यायालयीन हस्तक्षेपामुळे संघटनेवर बंदी येऊ शकते. परंतु भारतावर बंदी येणार नाही. कारण आम्ही येथील स्थितीची आणि धोरणाची योग्य कल्पना या अधिकाऱ्यांना देऊ,’’ असे भारतीय फुटबॉल महासंघाच्या सूत्रांनी सांगितले. भारतीय फुटबॉल संघटनेशी संलग्न असलेल्या २५ राज्य संघटनांनी शनिवारी आभासी (ऑनलाइन) बैठकीत सद्य:स्थितीबाबत चर्चा केली. ‘‘भारतावर बंदी घालू नये. आम्ही येत्या दोन महिन्यांत निवडणुका घेऊ, असे मी ‘फिफा’चे अध्यक्ष गियानी इन्फान्टिनो यांना सोमवारी कळवेन,’’ असे माजी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितल़े