Jonny Bairstow Angry Hitting After Getting Unsold In IPL 2025 Auction : जेद्दाह, यूएई येथे झालेल्या आयपीएल २०२५ मेगा ॲक्शनमध्ये अनेक मोठे खेळाडू विकले गेले नसले, तरी जॉनी बेअरस्टोचे अनसोल्ड राहणे आश्चर्यकारक राहिले. इंग्लंडच्या या स्फोटक यष्टीरक्षक फलंदाजावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही. आयपीएल २०१९ आणि २०१४ मध्ये शतके झळकावूनही या टॉप ऑर्डर फलंदाजाला कोणीही विकत घेतले नाही. आता, गेलेल्या काही दिवसांपूर्वी अनसोल्ड राहिलेल्या जॉनी बेअरस्टोने आयपीएल फ्रँचायझींनी किती मोठी चूक केली हे सिद्ध केले आहे. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
जॉनी बेअरस्टोची तुफान फटकेबाजी –
अबू धाबी टी-१० लीगमध्ये काल संध्याकाळी जॉनी बेअरस्टोने अवघ्या ३० चेंडूत ७० धावांची नाबाद खेळी साकारली. यादरम्यान त्याने अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज शरफुद्दीन अश्रफच्या एका षटकात तीन षटकार आणि दोन चौकारांच्या मदतीने २७ धावा कुटल्या.जबरदस्त पॉवर हिटिंग करताना, ३५ वर्षीय अनुभवी खेळाडूने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात शॉट्स लगावले. अबू धाबी टी-२० लीगच्या २८ व्या सामन्यात टीम अबू धाबीचा सामना मॉरिसविले सॅम्प आर्मीशी झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सॅम्प आर्मीने निर्धारित १० षटकात १०९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान अबुधाबी संघ संघर्ष करत असताना जॉनी बेअरस्टोने तुफान फटकेबाजी केली.
जॉनी बेअरस्टोने एका षटकात कुटल्या २७ धावा –
प्रतिकूल परिस्थितीत जॉनी बेअरस्टोने धुवाधार खेळी साकारली. डावखुरा फिरकी गोलंदाज शरफुद्दीन अश्रफला सहाव्या षटकात त्याने चांगलेच झोडपले. बेअरस्टोने डीप मिडविकेटवर दोन षटकार ठोकले. पुढच्या चेंडूवर त्याने थर्ड मॅनच्या दिशेने चौकार मारला आणि नंतर डीप मिडविकेटवर षटकार खेचला. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर या स्फोटक फलंदाजाने स्क्वेअर थर्ड मॅनला चौकार मारला. अशा या प्रकारे षटकात एकूण २७ धावा कुटल्या. एकेकाळी ६ षटकात ५४/३ धावसंख्या असतानाही या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. यजमान अबुधाबी संघाला १० षटकांत ४ बाद १०६ धावांपर्यंतच मजल मारता आली. ज्यामुळे संघ विजयापासून फक्त ४ धावा दूर राहिला. यावेळी बेअरस्टो नॉन-स्ट्राइक एंडवर उभा होता, तर दुसऱ्या टोकाला स्ट्राइक असलेला फलंदाज धावा करू शकला नाही.
जॉनी बेअरस्टो २०१९ पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. या स्पर्धेतील सामन्यांमध्ये त्याच्या नावावर दोन शतके आणि नऊ अर्धशतकांसह १५८९ धावा आहेत. २०१९ ते २०२१ पर्यंत, तो सनरायझर्स हैदराबादचा भाग होता, जिथे त्याचे मानधन २ कोटी २० लाख रुपये होती. २०२२ च्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने त्याला २०७ टक्के वाढीसह ६ कोटी ७५ लाख रुपयांना खरेदी केले. तेव्हापासून तो या संघाचा एक भाग होता. पण मेगा लिलावापूर्वी पंजाबने त्याला रिटेन केले नाही. यानंतर लिलावातही कोणत्या खेळाडूंनी त्याच्यासाठी रस दाखवला नाही.