Jonty Rhodes Explains Daughter India Name Story: दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि जगप्रसिद्ध क्षेत्ररक्षक जाँटी ऱ्होड्स याचं भारताशी असलेलं नातं काही वेगळंच आहे. क्रिकेटमध्ये जगातली बेस्ट फिल्डर्सच्या यादीत ऱ्होड्स पहिल्या स्थानी आहे. मूळचा दक्षिण आफ्रिकेचा असला तरी त्याचं भारतावर विशेष प्रेम आहे आणि हेच प्रेम व्यक्त करण्यासाठी ऱ्होडसने आपल्या लेकीचं नाव इंडिया असं ठेवलं आहे. ऱ्होड्सने आपल्या मुलीचं नाव ‘इंडिया’ का ठेवलं, यामागची खास गोष्ट सांगितली आहे. यादरम्यान त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही उल्लेख केला आहे. त्याच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भारताशी असलेल्या त्याच्या खास कनेक्शनची चर्चा सुरू झाली आहे.

जाँटी ऱ्होड्सचं भारताशी असलेलं नातं केवळ क्रिकेटपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. भारतात मुलीचा जन्म झाल्यापासून तिचं नाव ‘इंडिया’ ठेवण्यापर्यंत ऱ्होड्स कुटुंबाचा या देशाशी एक खास जिव्हाळा निर्माण झाला आहे. त्यामुळे भारताबद्दल बोलताना ऱ्होड्सच्या या खास आठवणी आणि भावना चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. सध्या एका मुलाखतीत जॉन्टी ऱ्होड्सने पुन्हा एकदा लेकीचं नाव इंडिया ठेवण्याबद्दल वक्तव्य केलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ऱ्होड्सने सांगितलं की, “माझ्या मुलीचं नाव इंडिया आहे. तिचा जन्म २०१५ मध्ये इथेच भारतात झाला. हा कोणताही राजकीय मुद्दा नाही. पण २०१४ पासून मोदीजी ‘Make in India’बद्दल बोलत होते, बरोबर ना? त्यामुळे माझी पत्नी आणि मी या विचाराशी खूप जोडले गेलो. आम्हाला २०१५ मध्ये लेक ‘इंडिया’ आणि २०१७ मध्ये मुलगा नॅथन झाला. त्यामुळे मोदीजींनी २०१४ मध्ये ‘Make in India’बद्दल बोलायला सुरुवात केल्यापासून आम्हीही ‘इंडिया’ घडवत आहोत, असंच म्हणता येईल. त्यामुळे भारताबद्दल आमच्या दोघांचंही तितकंच प्रेम आहे.”

जॉन्टी ऱ्होड्स २०१५ मध्ये आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा फिल्डिंग कोच म्हणून रूजू झाला होता. तो २००९ पासून मुंबई इंडियन्ससोबत या पदावर काम करत होता. याचदरम्यान एप्रिल २०१५ मध्ये जॉन्टी ऱ्होड्सच्या मुलीचा जन्म झाला. जिचं पूर्ण नाव इंडिया जीन ऱ्होड्स आहे. भारत दौरे आणि आयपीएलदरम्यान जॉन्टी ऱ्होड्सने भारतात बराच वेळ घालवला. तब्बल 9 वर्षे ऱ्होड्स हा मुंबई इंडियन्स संघाचा फिल्डिंग कोच होता. त्यामुळे मुंबईत आणि एकंदरीत भारतात त्याने आपल्या कुटुंबाबरोबर सर्वाधिक वेळ घालवला. दक्षिण आफ्रिकेत वाढलेल्या जाँटी रोड्सला भारताची विविधता, संस्कृती, वारसा, परंपरा आणि सतत सुरू असलेली लगबग विशेष भावली. हॉटेलच्या चौकटीबाहेर पडून भारतातील वेगवेगळी ठिकाणं अनुभवताना त्याला या देशाची ही वेगळीच बाजू जवळून पाहायला मिळाली. यामुळेच त्याने लेकीचं नाव इंडिया असं ठेवलं.

लेकीच्या जन्मानंतर मुंबईत असताना ऱ्होड्स कुटुंबाने त्यांच्या मुलीसाठी पूजा केली होती. पारंपरिक धोती परिधान करून रोड्स आणि मेलानी यांनी सर्व धार्मिक विधी आनंदाने पूर्ण करत ही पूजा पार पाडली होती. रोड्सची पत्नी मेलानी वेदांत तत्त्वज्ञानाच्या विचारांशी जोडलेली होती आणि भारताविषयी तिच्या मनात आधीपासूनच एक आध्यात्मिक ओढ होती. भारत भेटीदरम्यान तिच्या या आध्यात्मिक नात्याला आणखी बळ मिळालं आणि त्यामुळे ऱ्होड्स कुटुंबाचं भारताशी असलेलं नातं अधिक घट्ट झालं. मुलीचं इंडिया नाव ठेवण्याचं कारण सांगताना ऱ्होड्स म्हणाला होता, “माझ्या मुलीला भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशांतील सर्वोत्तम गोष्टी अनुभवता याव्यात आणि तिच्या आयुष्यातही तसाच समतोल राहावा, अशी माझी इच्छा होती.”